
>> रविप्रकाश कुलकर्णी
पुस्तकांच्या गराड्य़ात बसायला, वावरायला मला आवडतं. मी त्यात रमतो. ते म्हणतात ना, रामकथा असली की, एक पाट समोर ठेवायचा. अदृश्यपणे हनुमंत तेथे येऊन बसतो अशी भावना असते. तसं पुस्तकासंदर्भात कुठलाही कार्यक्रम असला की, मला पुस्तकांची हाक येते आणि मी चुंबकाने आकर्षिले जावे त्या ओढीने असल्या कार्यक्रमाला जात असतो.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुणे येथे गेली दोन वर्षे जो पुस्तक महोत्सव झाला, त्याने अपेक्षापेक्षा जास्त यश मिळवले. हे केवळ पुस्तक विक्रीसंदर्भात नसून त्यानिमित्ताने जी वातावरण निर्मिती केली होती ती अपूर्व अशीच होती. 18 डिसेंबर रोजी व्हाट्सआपवरील बुक क्लबचं संमेलन फर्ग्युसन कॉलेजच्या सुंदर इमारतीत पहिल्या मजल्यावर झाले. त्यात लेखक, वाचक, प्रकाशक, चित्रकार, ग्रंथपाल अशा पन्नासएक जणांचा सहभाग होता. इथेदेखील पुस्तक प्रकाशने झाली.
अशा पुस्तक प्रदर्शनाचा फायदा म्हणजे एकाच वेळी वाचकाला वेगवेगळ्या प्रकाशकांची वेगवेगळी परिचित पुस्तके तर एके ठिकाणी पाहायला मिळतातच. शिवाय अपरिचित प्रकाशकांची अपरिचित पुस्तकेदेखील पाहायला मिळतात. यातले काही अनुभव
सध्या ‘देवमाणूस’सारख्या मालिकेत चमकणारा मिलिंद शिंदे याचा एक कवितासंग्रह हाताशी आला. हा ‘तीरिया’ नावाचा कवितासंग्रह मैत्री पब्लिकेशनने प्रकाशित केलेला आहे. एरवी हा संग्रह निघालाय हेदेखील कळलं नसतं आणि कळलं तरी हे मैत्री पब्लिकेशन कसं शोधलं असतं? मराठीतील पहिली कादंबरी ‘यमुना पर्यटन’ स्नेहवर्धन प्रकाशनाच्या स्टॉलवर मिळेल असं व्हाट्सआपवर आलं होतं. ते वाचून जबरे वाचक श्रीखंडे तो स्टॉल शोधत गेले आणि त्यांनी ते पुस्तक मिळवले. तो आनंद त्यांनी लगेच बुक क्लबवर शेअर केला!
पद्मगंधा प्रकाशनाच्या स्टॉलवर डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांच्या ‘काव्यचिंतन’ पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन (माझ्या हस्ते!) झाले. विशेष म्हणजे तेथे समारंभात सहभागी असलेल्या वि.ग. सातपुते यांनी सांगोलेकर यांना2026 चा ‘महाकवी कालिदास’ पुरस्कार जाहीर करून टाकला!
असं अक्षरश प्रत्येक स्टॉलवर कमी जास्त प्रमाणात काहीतरी घडत होतं, तेदेखील प्रचंड गर्दीत. अशी एवढय़ा प्रमाणात उलाढाल यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. खरं तर दमछाकदेखील झाली..
युनेस्कोतर्फे ‘जागतिक पुस्तक राजधानी’ हा दर्जा एका शहराला दिला जातो. 2003 मध्ये हा मान दिल्लीला मिळाला होता, पण आताचा अनुभव पाहून राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुणे शहराला पुस्तक राजधानीचा मान मिळवण्यासाठीचा अर्ज करण्यात आलेला आहे. भविष्य नाही, पण माझा अनुभव सांगतो. हा मान पुण्याला मिळणार आहे. लवकरच ही आनंदाची बातमी तुम्हाला कळेल. पुणे पुस्तक महोत्सवाची ही फलश्रुती आहे याचीदेखील मी प्रथम दखल घेतली ही नोंद.





























































