
मीरा-भाईंदरमध्ये युतीच्या चर्चेवरून भाजपने शिंदे गटाची चांगलीच कोंडी केली आहे. चर्चेच्या फेऱ्या करण्यासाठी ठरवलेल्या त्रिसदस्यीय समितीची बैठक होण्यापूर्वीच शुक्रवारी या समितीचे सदस्य आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंच्या ताकदीची चिरफाड केली. शिंदे गटाची ताकद केवळ सहा जागांवर आहे असे सांगून युतीसाठी जाहीरपणे दोन अटी घातल्या आहेत. यामध्ये शिंदे गटाने भाजपची फोडलेली माणसं आधी परत पाठवावीत. तसेच तुमच्या पदाधिकाऱ्याने अडवलेले शिवार गार्डन येथील ‘टाऊन पार्क’ मोकळे करा असे सुनावले आहे. त्यामुळे युतीच्या नावाखाली तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना मेहता यांनी शिंदे गटाची पार हवा काढली. ते म्हणाले, पालिकेच्या ९५ जागांपैकी ६६ जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. शिल्लक राहिलेल्या २९ जागांपैकी ८ जागा राष्ट्रवादीला देण्यात येणार आहेत. त्यामुळे उर्वरित २१ जागांवर शिंदे गटाबरोबर युती करायची झाल्यास त्यातील केवळ सहा जागांवरच त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतील. या सर्व बाबी लक्षात घेण्यात येणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.
भाजपने स्वबळावर लढावे ही नवी मुंबईकरांची इच्छा; संजीव नाईक यांनी एकनाथ शिंदेंना डिवचले




























































