
सोने, चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शुक्रवारी मुंबई आणि दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. सोन्याची वाटचाल दीड लाखांकडे सुरू आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 42 हजार 545 वर पोहोचला आहे, तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1 लाख 29 हजार 450 रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीतही सोन्याच्या दरात चांगलीच वाढ दिसून आली. राजधानीत एक तोळा (10 ग्रॅम) सोन्यासाठी 1 लाख 42 हजार 845 रुपये दर सुरू आहे.
सोन्यासह चांदीही चांगलाच भाव खात आहे. चांदी 2 लाख 35 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली असून आगामी काळात सोने दीड लाख, तर चांदी अडीच लाखांचा टप्पा पार करण्याची अंदाज वर्तवला जात आहे. या वर्षा सोन्याने 80 टक्क्यांहून अधिक, तर चांदीने 150 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा झाला.
एवढी तेजी कशामुळे?
चीनसारखे देश आपल्या मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा वाढवत आहेत, ते वर्षभरात 900 टनांपेक्षा जास्त खरेदी करत आहेत, त्यामुळे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत आहेत. सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर चांदीचा वापर होत आहे. त्यामुळे चांदी आता एक आवश्यक कच्चा माल बनली आहे. त्यामुळे चांदीची ऐतिहासिक भरारी सुरू असून आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.




























































