
नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शहर पदाधिकारी मेळावा पार पडला. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, दुपारची वेळ झाली आहे, सगळ्यांना भूक लागली असेल; परंतु आपल्यापेक्षा जास्त भूक ही भाजपला लागलेली आहे. त्यांना अशी भूक लागलेली आहे की आपण महाराष्ट्र कधी गिळतो आणि बिल्डर व कॉन्ट्रॅक्टरांच्या घशात कधी घालतो, याचीच त्यांना घाई आहे. ही भूक अत्यंत भयानक आहे. ही महाराष्ट्र संपवणारी भूक आहे, शहरं उद्ध्वस्त करणारी भूक आहे आणि आपल्या देशाला मागे नेणारी भूक आहे.
आपण 2014 पासून त्यांना पूर्ण सत्ता दिली होती. 2014 तुम्हाला आठवत असेल, 2017 तुम्हाला आठवत असेल. केंद्रातही त्यांचे सरकार, राज्यातही त्यांचे सरकार; पण तुम्ही मला सांगा, त्यांनी दाखवलेली एक तरी स्वप्न पूर्ण झाली का? “अच्छे दिन” येणार आहेत, असे सांगितले गेले होते. बारा वर्षे झाली, चांगले दिवस आले का? दोन कोटी तरुणांना रोजगार देणार होते, वीस लाखांनाही मिळाला का? उलट बेरोजगारी वाढत चालली आहे. रुपया डॉलरच्या बरोबरीला येणार होता, एकाला एक होणार होता, असे सांगितले गेले होते. आज रुपया कुठपर्यंत पोहोचला आहे? नव्वद, ब्याण्णव, पंच्याण्णवपर्यंत जात आहे. आपले तरुण-मुली जे परदेशात शिकायला जातात, मध्यमवर्गातून येतात, त्यांना रुपया-डॉलर कन्वर्जनचा सर्वात मोठा फटका बसतो आहे.
महिलांच्या सुरक्षेबाबत खूप मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती. महिलांचा सन्मान, महिलांना नोकऱ्या, सुरक्षा देण्याची भाषा करण्यात आली होती. पण खरोखर आज तुम्हाला वाटते का की या देशात महिला सुरक्षित आहेत? आपली जंगलं सुरक्षित नाहीत, आपले तरुणांना रोजगार मिळत नाही, उद्योगधंदा वाढत नाही, शहरं सुधारत नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, कायदा-सुव्यवस्थेचे चिंधडे उडालेले आहेत. मंत्र्यांना जबाबदारीची जाणीव नाही, संवेदनशीलता नाही. अशा परिस्थितीत जर तुमच्या दारी कोणी भाजपवाले आले, तर त्यांना सरळ सांगा – बारा वर्षे बहुमताचे सरकार आहे; एक तरी चांगले काम दाखवा, मग आम्ही मत देऊ.
मुंबई महानगरपालिकेबद्दल त्यांनी टीका केली; पण आम्ही अभिमानाने 1997 ते 2022 या काळातील मुंबई महानगरपालिकेतील कामे दाखवली. महापौर आमचे होते, समित्या आमच्या ताब्यात होत्या आणि आम्ही केलेली कामे मोठ्या स्क्रीनवर दाखवली. मी मुख्यमंत्री महोदयांना आव्हान दिले की सहा वर्षे मुख्यमंत्री आहात, केंद्रात तुमचे सरकार आहे, पंतप्रधान तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत – स्वतःच्या नावावर एक तरी मोठे काम दाखवा. काहीच दाखवता आले नाही.
आता नाशिकचाच विचार करा. 2017 मध्ये बहुमत कोणाचे होते? सत्ता कोणाची होती? महापौर कोणाचा होता? मुख्यमंत्री कोणाचे होते? सर्व काही भाजपचे होते. मग नाशिकचे चित्र बदलले का? नाशिक वॉशिंग्टनच्या बरोबरीला पोहोचले का? उलट नाशिकचे मूलभूत प्रश्न – रस्ते, पाणी, वाहतूक, आरोग्य, प्रदूषण – याकडे लक्षच दिले गेले नाही.
भाजपचे राजकारण ठरलेले आहे. ते मुद्द्यांवर बोलत नाहीत. ते जातीय तणाव निर्माण करतात, धार्मिक तेढ निर्माण करतात, हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात भांडणे लावतात, मराठी-अमराठी वाद पेटवतात. पण मी सांगतो – मुद्द्यावर बोला. नाशिकवर बोला, नाशिककरांच्या प्रश्नांवर बोला.
तपोवन आणि पंचवटीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. ही प्रभू श्रीरामाच्या पावन पदस्पर्शाची भूमी आहे. येथे तपश्चर्या झालेली आहे. इथे जी जंगलं आहेत ती आपल्या परंपरेचा वारसा आहेत. हे तपोवन कापून साधुग्रामाच्या नावाखाली ग्रीन झोनला यलो झोनमध्ये आणून बांधकामे उभारण्याचा डाव रचला जात आहे. कुंभमेळा संपला की ती जमीन बिल्डरांच्या घशात टाकली जाणार, असा खेळ सुरू आहे. रामाचे नाव घेऊन तपोवन नष्ट करणारे हे खरे रामभक्त कसे म्हणायचे? हे रावणराज्य आणू इच्छिणाऱ्यांचे काम आहे. राम आमच्या मनात आहेत, हनुमान आमच्या हृदयात आहेत. खरे रामभक्त असाल तर तपोवन वाचवाल.
आज देशभरात हेच चित्र आहे. अरावलीत डोंगर कापले जात आहेत, पश्चिम घाट नष्ट केले जात आहेत, नागपूरमधील अजनी वन तोडले जात आहे, नाशिकचे तपोवन नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय जनता पक्ष नव्हे, ही आता बिल्डर जनता पार्टी झाली आहे. सगळीकडे खणकाम, मायनिंग, जंगलतोड – आणि त्यातून नफा मिळवण्याचा उद्योग सुरू आहे.
भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. जे लोक पूर्वी भ्रष्टाचारात आरोपी होते, ज्यांच्याविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांनी लाठ्या खाल्ल्या, आंदोलन केले, त्यांनाच आज पक्षात घेतले जात आहे. मग भाजप कार्यकर्त्यांनी विचारायचे नाही का – आम्ही ह्याच्यासाठी लढलो होतो का?
महिलांवर अत्याचार होतात, बलात्काराच्या घटना घडतात. आरोपींना जामीन मिळतो, काही लोक त्यांना माळा घालतात, अभिनंदन करतात. आणि पीडित महिला न्याय मागायला रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्यांनाच अटक केली जाते. हे जंगलराज नाही तर काय? ‘लाडकी बहिण’ नाव दिले, पण ना खरी सुरक्षा, ना खरी मदत.
शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी महिलांचे कुंकू पुसले जात आहे. कर्जमाफी होत नाही. गुंतवणूक येत नाही, उद्योगधंदे राज्याबाहेर जात आहेत. तीन-तीन वर्षे शहरांचे वाटोळे केले गेले, विकास खुंटवला गेला.
तपोवनाबद्दल मी स्पष्ट सांगतो: तपोवनाला वनक्षेत्राचा, जंगलाचा कायदेशीर दर्जा मिळाला पाहिजे. इथे साधू-संतांनी शांततेत तपश्चर्या करावी, हीच खरी परंपरा आहे. पंचमहाभूतांची पूजा हीच खरी पूजा आहे. नदी, जंगल, पर्वत, वारा, आकाश – हे जपले तरच धर्म टिकतो. पंचमहाभूतांना आपणच प्रदूषित करणार असू, तर मग धर्म कसा टिकणार?
नाशिकसाठी आमची स्वप्ने ठाम आहेत. पुढील पाच वर्षांत नाशिक महानगरपालिकेचे एक मेडिकल कॉलेज उभे करायचे आहे. उत्तम आरोग्यव्यवस्था निर्माण करायची आहे. महानगरपालिकेच्या शाळा दर्जेदार करायच्या आहेत. मराठीसोबत इंग्रजी, हिंदी, उर्दू आदी भाषांमध्ये शिक्षण देणाऱ्या आधुनिक, डिजिटल शाळा उभारायच्या आहेत. मुलांचे भवितव्य पक्के करायचे आहे. नाशिकमध्ये चांगली बससेवा उभी करायची आहे, परवडणारी तिकीट रचना आणायची आहे, महिलांसाठी सुलभ प्रवास व्यवस्था उभी करायची आहे. मोकळी उद्याने, हिरवळ, श्वास घेता येईल असे शहर तयार करायचे आहे.
ही लढाई सत्तेसाठी नाही. ही नाशिकच्या भवितव्याची, आपल्या मुलांच्या भविष्याची लढाई आहे. दोन भाऊ एकत्र आले आहेत. मनसे आणि दिलसे दोघे एकत्र आले आहेत. काँग्रेस, एनसीपी, कम्युनिस्ट पक्षही आमच्यासोबत येत आहेत. एका बाजूला सत्तेची भूक आणि भ्रष्टाचार, तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिक नाशिककरांची एकजूट – हे चित्र स्पष्ट आहे.
मशालचे चिन्ह घरोघरी पोहोचवा. जनता एकत्र आली तर रावणराज्य पळेल आणि रामराज्य येईल. नाशिकवर प्रेम करणारा महापौर हवा, दिल्लीसमोर नतमस्तक होणारा महापौर नको. परिवर्तनाचा दिवस जवळ आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधा. पैशांच्या प्रलोभनांना न जुमानता प्रामाणिकपणे मतदान करा असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच परिवर्तन घडवायचे असेल तर प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक तास महत्त्वाचा आहे. नाशिककरांनी ठरवायचे आहे भवितव्य निवडायचे की अंधार असेही आदित्य ठाकरे म्हणाले.






























































