
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिला व तिच्या आईने आज सीबीआयवर गंभीर आरोप केले. ‘सीबीआयचा तपास अधिकारी आम्हाला भेटत नाही. तो गुन्हेगाराच्या कुटुंबाशी बोलतो. त्याने गुन्हेगारांशी आणि न्यायाधीशांशी हातमिळवणी केली आहे. मग सीबीआयवर विश्वास ठेवायचा कसा,’ असा संतप्त सवाल या मायलेकींनी केला.
उन्नाव बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार, भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर याची जन्मठेपेची शिक्षा कमी करून उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दरम्यान, पीडित महिलेने व तिच्या आईने आज सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या ‘एएनआयंशी बोलत होत्या.
‘सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने आमचा विश्वासघात केला. आरोपीशी आणि न्यायाधीशांशी हातमिळवणी करून त्याने या खटल्यात आरोपीचा फायदा करून दिला. माझे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी, खटल्याचा निकाल माझ्या विरोधात लागावा यासाठी तपास अधिकाऱ्याने बरेच प्रयत्न केले,’ असा आरोप बलात्कार पीडितेने केला. ‘सीबीआय आमच्यामागे उभी राहिली असती तर आम्हाला हा दिवस बघावा लागला नसता,’ असे पीडित महिला म्हणाली.
फूलनदेवी बनून सेंगरला मारेन !
‘मी मागे हटणार नाही. जिवात जीव असेपर्यंत लढत राहणार, मग मरण आले तरी बेहत्तर. दुसऱ्या कोणी मला मारले तर गोष्ट वेगळी आहे, पण स्वतःहून मरणार नाही. मला दोन मुलं आहेत. जिवंत राहून लढणार. सेंगर समोर आला तर नाइलाजाने मला फूलनदेवी बनून त्याला मारावे लागेल,’ असेही पीडिता म्हणाली.
‘त्या’ जजला समोर बोलवा !
‘एक कुटुंब दहशतीखाली आहे आणि दुसरीकडे गुन्हेगाराला मोकाट सोडले जातेय. हा अन्याय आहे. याचा अर्थ जजने भरपूर पैसा खाल्ला आहे. त्यांना माझ्यासमोर बोलवा. मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. तो माझा अधिकार आहे,’ असे पीडित महिला म्हणाली.
ते सेंगरच्या मुलीशी बोलतात !
‘सीबीआयचा अधिकारी आम्हाला भेटला तर त्याच्यावर विश्वास बसेल. आमचे त्याच्याशी बोलणेच झालेले नाही. उलट तो गुन्हेगाराच्या कुटुंबाला भेटतो. कुलदीप सेंगरच्या मुलीशी बोलतो,’ असा आरोप पीडित महिलेच्या आईने केला.
‘सेंगरचं कुटुंब फटाके फोडतंय. आम्ही कोणत्या प्रसंगातून जातोय, मला विचारा. माझ्या वडिलांचा खून झाला. मला आणि माझ्या नवऱ्याला नोकरीवरून काढलं. मला दोन लहान मुलं आहेत. आम्ही काय खायचं? कुठं जायचं?’



























































