
छत्तीसगडमध्ये असलेले धीरेंद्र शास्त्री तथा बागेश्वर बाबा यांच्यासाठी सरकारने चार्टर्ड विमान उपलब्ध करून दिल्याने व डयुटीवर असलेला पोलीस कर्मचारी धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडल्याने वादाला तोंड फुटले आहे. या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली आहे. बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री हे गुरुवारी रायपूरमध्ये पोहोचले. दुर्ग जिल्ह्यातील भिलई येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. त्यांच्यासाठी छत्तीसगड सरकारने खास चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. त्यांच्या दिमतीला सरकारमधील मंत्री व भाजप नेते गुरू खुशवंत साहेब हे होते. विमानतळावर उतरल्यानंतर सरकारी प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी तिथे डयुटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने कहरच केला. बागेश्व बाबा विमानातून उतरत असताना त्याने स्वतःच्या पायातील बूट काढले. डोक्यावरील पोलिसांची टोपी काढली. त्यानंतर बाबांना कडक सॅल्यूट ठोकला. इतकेच नव्हे तर त्यांचे पाय धरले.
ही सरकारी पैशाची उधळपट्टी
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने सरकारवर जोरदार निशाणा साधला. बागेश्वर बाबासाठी सरकारी विमानाचा वापर ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, अशी टीका काँग्रेसने केली. तर, पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही केली. बागेश्वर बाबाचे पाय धरणाऱ्या पोलिसाची भाजपने पाठराखण केली. हा व्यक्तिगत श्रद्धेचा विषय आहे, असे भाजप म्हणाला.




























































