भाजप हिंदुत्वाचा आणखी किती अपमान करणार? सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीने नवा गदारोळ, हिंदू महासंघाचे अध्यक्ष दवे यांची भाजपवर टीका

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीमधील छायाचित्रामध्ये गणपती बाप्पाच्या डोक्यावर चक्क सांताक्लॉजची टोपी घालण्यात आल्याने भाजपचे बेगडी हिंदुत्व पुन्हा एकदा उघड झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चमध्ये गेले म्हणून तुम्हाला गणपतीचे धर्मांतर करण्याची परवानगी मिळाली असा त्याचा अर्थ होत नाही. भाजप हिंदुत्वाचा आणखी किती अपमान करणार आहे, असा सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे. जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या सांस्कृतिक मंत्र्याचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपच्या हिंदूविरोधी कृतींवरून त्यांचे खोटारडे हिंदुत्व अनेक वेळा उघड झाले आहे. नाताळनिमित्त पंतप्रधान मोदी चर्चमध्ये गेल्याने अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून त्यांच्यावर टीका सुरू असतानाच, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने एका वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये गणपतीला सांताक्लॉजची टोपी घालून गणेशाला सांताक्लॉजच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न केल्याने गदारोळ निर्माण झाला आहे.