
मागील काही महिन्यांमध्ये विविध स्पर्धांमध्ये खेळ सुरू असताना खेळाडूंचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली असून बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ढाका कॅपिटल्स संघाच्या प्रशिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सहकाऱ्यांनी त्यांना CPR देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला परंतू रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ढाका कॅपिटल्स संघ आपला पहिला सामना खेळण्यापूर्वी सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सराव करत होता. सराव सुरू असताना सहायक प्रशिक्षक महबूब अली सुद्धा सराव सत्रामध्ये सहभागी झाले होते आणि खेळाडूंना त्यांनी काही सुचना सुद्धा केल्या होत्या. मात्र, याच दरम्यान ते मैदानातच कोसळले. त्यांना तात्काळ CPR देण्यात आला आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
























































