प्रदूषणकारी 4 आरएमसी प्लांटवर कारवाई; 1.87 कोटींचा दंड

मुंबईचे वातावरण प्रदूषणामुळे दिवसेंदिवस खराब होत असतानाच प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या रेडिमिक्स काँक्रिट प्लांट (आरएमसी)वर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत मुंबईतील 4 आरएमसी प्लांट बंद करण्यात आले असून प्रदूषण रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 37 आरएमसी युनिटकडून 1.87 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर पालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील विविध बांधकामस्थळी भरारी पथकांमार्फत भेट देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीदेखील भरारी पथके स्थापन केली असून दोन पथके मुंबईत तर दोन पथके नवी मुंबईत नेमण्यात आली. आरएमसी प्लांटद्वारे प्रदूषणाबाबतचे नियम पाळले जात आहेत की नाही हे तपासण्यासाठी पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. त्यावेळी अनेक ठिकाणी आरएमसी प्लांटकडून प्रदूषणबाबतचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले.