शुभमन गिलचे प्रमोशन ठरले पक्के, बीसीसीआयच्या केंद्रीय करारात मोठ्या बदलांचे संकेत

बीसीसीआय लवकरच हिंदुस्थानी क्रिकेटपटूंसाठी 2026 सालाची केंद्रीय करार यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या यादीत टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळवू न शकलेल्या शुभमन गिलला ए ग्रेड प्लसमध्ये स्थान देण्याचे पक्के ठरले आहे. येत्या एक-दोन दिवसांत ही नवी यादी प्रसिद्ध होणार असून यामध्ये काही मोठे आणि निर्णायक बदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

सर्वाधिक चर्चेत आहेत तब्बल दोन वर्षांनंतर हिंदुस्थानी संघात पुनरागमन करणारा धडाकेबाज ईशान किशन आणि सध्याचा कसोटी तसेच वन डे कर्णधार शुभमन गिल. सूत्रांच्या माहितीनुसार, ईशान किशनचे केंद्रीय करारात पुनरागमन झाले होते, पण त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. मात्र आता त्याची टी-20 वर्ल्ड कप 2026 संघात निवड झाली असून त्याला ‘सी’ ग्रेडमधून ‘बी’ ग्रेडमध्ये प्रमोशन देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे काही बदल होणार असून काही खेळाडूंना या करारातून बाहेर काढण्याचीही तयारी बीसीसीआयने केली आहे.

दुसरीकडे, शुभमन गिलच्या करारातील प्रमोशनवरही शिक्कामोर्तब जवळजवळ निश्चित आहे. सातत्यपूर्ण कामगिरी, नेतृत्वाची जबाबदारी आणि सर्व फॉर्मेटमधील योगदान लक्षात घेता त्याला थेट ‘ए’ ग्रेड प्लसमध्ये स्थान मिळू शकते.

रोहित-विराट ‘ए’ ग्रेडमध्ये

हिंदुस्थानी क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी ही यादी थोडी धक्कादायक ठरू शकते. कसोटी आणि टी-20 फॉर्मेट खेळत नसल्याने त्यांचे ‘ए प्लस’मधून ‘ए ’ग्रेडमध्ये डिमोशन केले जाणार आहे. हे डिमोशन त्यांच्या लौकिकास साजेसे नसल्यामुळे त्यांच्याबाबत बीसीसीआय काही वेगळे निर्णयही करू शकते, पण त्याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

पंच व सामनाधिकाऱयांच्या मानधनावरही चर्चा

खेळाडूंच्या करारांसोबतच बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमधील पंच आणि सामनाधिकाऱयांच्या मानधनवाढीवरही मंथन करत आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मागणीवर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असून त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

बीसीसीआय केंद्रीय कराराची संभाव्य यादी

ए ग्रेड प्लस (एलीट): शुभमन गिल (ए श्रेणीमधून प्रमोशन),जसप्रीत बुमरा, रवींद्र जाडेजा
रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे श्रेणीत बदल होण्याची शक्यता.

‘ए’ ग्रेड: रोहित शर्मा (ए ग्रेड प्लस डिमोशन), विराट कोहली (ए ग्रेड प्लस डिमोशन), मोहम्मद सिराज, के. एल. राहुल, हार्दिक पंडय़ा, मोहम्मद शमी, ऋषभ पंत

‘बी’ ग्रेड: सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैसवाल, श्रेयस अय्यर

‘सी’ ग्रेड: रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिष्णोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

(टीप- या यादीतून काही खेळाडूंचे प्रमोशन, डिमोशन आणि वगळले जाणेही निश्चित आहे.)

या बातमीसाठी इंग्रजी छोट्या लिपीमध्ये SEO लिहून द्या.