केवळ अफवा, काही गंभीर नाही! गौतम गंभीर यांच्या ‘डच्चू’च्या अफवांवर सचिव सैकियांचा फुलस्टॉप

हिंदुस्थानला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. गेल्या वर्षी 2024 मध्ये घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 0-3 अशी दारुण पराभवाची मालिका अनुभवावी लागली होती. या सलग अपयशांमुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना संघातून डच्चू देत माजी स्टायलिश फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मणकडे संघाची सूत्रे सोपविली जाणार असल्याच्या चर्चांना अक्षरशः उधाण आले होते. पण या केवळ अफवा असून यात गंभीर असे काही नाही. त्यामुळे गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदालाही कोणता धोका नसल्याचे बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले. परिणामतः गंभीर यांच्या डच्चूच्या अफवांना आपोआप पूर्णविराम लागला आहे.

गेले काही दिवस गंभीर यांची प्रशिक्षकपदावरून गच्छंती होण्याची चर्चा आणि अफवा जोर धरू लागली होती. सोशल मीडियावर सर्वात जास्त ट्रोल होणाऱया व्यक्तींमध्ये गंभीर आघाडीवर आहेत. तसेच बीसीसीआयवरही याबाबत अधिक दबाव वाढत असल्यामुळे एका प्रभावी व्यक्तीने व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी अनौपचारिक चर्चा केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे गंभीर यांचे कसोटी संघाचे प्रशिक्षक म्हणून भवितव्य धोक्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

गंभीर यांच्यापुढील आव्हाने

कसोटीतील अपयशानंतर गौतम गंभीर यांच्यासमोर पुढील मोठे आव्हान म्हणजे न्यूझीलंडविरुद्धची झटपट मालिका. ही मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार असून त्यात तीन वन डे आणि पाच टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, टी-20 वर्ल्ड कप 2026 (हिंदुस्थान-श्रीलंका संयुक्त यजमान) आधी ही हिंदुस्थानी संघाची शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे.

सैकियांचा ठाम इन्कार

मात्र या सर्व अफवांवर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट शब्दांत विराम दिला आहे. त्यांनी सांगितले, या सर्व बातम्या निराधार आणि अफवांवर आधारित आहेत. आम्ही कोणाशीही कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. गौतम गंभीर आपल्या करारानुसार हिंदुस्थानी कसोटी संघाचे प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.

सैकियांच्या या वक्तव्यामुळे गंभीर यांना बीसीसीआयचा पूर्ण आणि ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिंदुस्थानचा आगामी कसोटी कार्यक्रम

हिंदुस्थानी संघाचा पुढील कसोटी कार्यक्रमही तितकाच महत्त्वाचा आहे.

हिंदुस्थानच्या आगामी कसोटी मालिका

14 ते 18 जून – अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी
ऑगस्ट 2026 – श्रीलंका दौऱयावर दोन कसोटी
ऑक्टोबर 2026-न्यूझीलंड दौऱयावर दोन कसोटी
जानेवारी-फेब्रुवारी 2027-ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच कसोटींची मालिका.