
ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ठाण्यात ‘नमो भारत नमो ठाणे’ असे बॅनर्स लावले आहेत. त्यावरून शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी आज खरपूस समाचार घेत भाजपला सुनावले. ‘नमो’ नव्हे तर हे शिवसेनेचेच ठाणे आहे. ठाणे आणि शिवसेना तसेच शिवसेना आणि ठाणे हे अतूट नाते असून बॅनरबाजी करणाऱ्या भाजपला येथील जनता घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही विचारे यांनी ठणकावले.
या बॅनरबाजीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते राजन विचारे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपला जोरदार तडाखे लगावले. ते म्हणाले, निवडणुका आल्या की भाजपला या गोष्टी आठवतात, हिंमत असल्यास विकासाचे बॅनर लावा. गोदींच्या नमो बँनरचे राजकारण करून तुम्ही किती दिवस लोकांची फसवणूक करणार आहात, असा सवालही विचारे यांनी केला. गेल्या ३० वर्षांपासून ठाणे आणि शिवसेना हे एक वेगळे नाते आहे. शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना’ हे एकमेव ब्रीदवाक्य राहिले आहे. दरम्यान भाजपच्या बॅनरबाजीचा नेटकऱ्यांनीदेखील सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली आहे.
ठाकरे ब्रँड चालणार
ठाणे पालिकेच्या निवडणुकीत भाजपकडे चेहरा नाही, त्यामुळे यांना पंतप्रधानाचा फोटो वापरावा लागत आहे. सर्व ठाणेकरांना ही गोष्ट खटकलेली आहे. ठाण्यात नमो ब्रेड नव्हे तर ठाकरे अँडच चालेल, असा विश्वास विचारे यांनी यावेळी व्यक्त केला.
मनसेनेही उडवली खिल्ली
भाजपने केलेल्या बॅनरबाजीला मनसेने उत्तर दिले असून ‘नमो’ नव्हे ‘मौन’ ठाणे अशी खिल्ली उडवली आहे. धरण कसे मिळणार याचे बं नर लावा. वाहतुकीच्या प्रश्नावर बॅनर लावा. त्यामुळे नमोच्या उलट मौन ठाणे म्हणजेच ठाणे शांत आहे, त्यांना डिवचू नका, असा इशाराही मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला.


























































