
ठाण्यात दुबार मतदारांची साफसफाई महापालिका प्रशासनाने केली आहे. या दुबार मतदारांची सखोल छाननी पूर्ण करण्यात आल्यानंतर शहरात १६ हजार ५७४ दुबार मतदार असल्याचे महापालिकेने आज स्पष्ट केले आहे. या मतदारांनी एकाच ठिकाणी आणि एकदाच मतदान करत असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत तब्बल ८३ हजार ६४४ दुबार मतदार असल्याची कबुलीच काही दिवसांपूर्वी दिली होती. पालिकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एकूण ३३ प्रभागांत दुबार मतदारांची यादी जाहीर केली होती. या मतदारांची सखोल छाननी पूर्ण करण्यात आली आहे. मतदार यादी पडताळणीत ७६ हजार ७१ मतदारांची नावे व फोटो एकमेकांशी जुळत नसल्याने हे दुबार मतदार’ नसल्याने पालिकेने स्पष्ट केले, त्यामुळे या मतदारांच्या नावासमोरील स्टार चिन्ह हटवण्यात येणार असून या मतदारांना कोणत्याही अडथळ्याविना मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.


























































