
ठाणे निवडणूक कामासाठी कर्मचारी मिळत नसल्याची बोंब सुरू असताना जीएसटी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी कर्मचारी देण्यास टाळाटाळ केली आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून सहाय्यक आयुक्तांना शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. पालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तशी नोटीस पाठवली आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या कामासाठी जीएसटी विभागाकडून ९० कर्मचाऱ्यांची मागणी निवडणूक विभागाकडून करण्यात आली होती. तशा प्रकारचे पत्रदेखील जीएसटी विभागाला देण्यात आले होते. मात्र आर्थिक वर्ष अखेर वसुलीचे काम जास्त असल्याने डिसेंबरनंतर कर्मचारी उपलब्ध करून देता येतील, असे उत्तर जीएसटी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडून देण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाला याची माहिती कळताच निवडणूक विभागाच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केल्याने शिस्तभंगाची तसेच निवडणुकीच्या कामात अडथळा आणला असल्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
गुन्ह्याच्या भीतीने पोलीसही हजर
ठाण्यातील पोलिसांना निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे, मात्र मुंब्रा पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने गुन्हे दखल करण्याचे आदेश देण्यात आले. फौजदारी गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने हजर न झालेले सर्व कर्मचारी आज हजर झाले आहेत.


























































