
कर्नाटक राज्यातील कागवाड येथील शिरगुप्पी शुगर वर्क्स या साखर कारखान्याचे रासायनिक मळीमिश्रित दूषित पाणी महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी हद्दीतील कृष्णा नदीत सोडले आहे. यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रदूषणामुळे हजारो ग्रामस्थ आजारी पडले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून या कारखान्याने सुमारे दोन किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकून दूषित पाणी गणेशवाडीतील ओढय़ामध्ये सोडले आहे. तेथून हे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. परिणामी नदीतील पाणी दूषित होऊन
तीव्र दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.
या प्रदूषणाचा फटका शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी, शेडशाळ, कवठेगुलंद, गौरवाड, औरवाड, शिरटी, हासूर, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, बुबनाळ, आलास, राजापूर, बस्तवाड यांसह नदीकाठच्या सुमारे 30 ते 35 गावांना बसला आहे. अनेक ग्रामस्थांना त्वचारोग, पोटदुखी, उलटय़ा-जुलाब, ताप अशा आजारांनी ग्रासले आहे. यापूर्वीही ग्रामस्थांकडून प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेकवेळा निवेदने देण्यात आली होती. मात्र, कारखाना प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


























































