आम्ही हिंदुस्थानातले सर्वात मोठे पळपुटे म्हणाणाऱ्या ललित मोदीने मागितली माफी

देशाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या आणि आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदी सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी आम्ही हिंदुस्थानातील सर्वात मोठे फरार पळपुटे असल्याची कबुली दिली होती. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर केंद्र सरकारनेही याची दखल घेतली होती. यामुळे आता ललित मोदीचे सुर बदलताना दिसत आहेत.

IPL चे माजी अध्यक्ष ललित मोदीने X वर पोस्ट शेअर करून या व्हिडीओप्रकरणी माफी मागितली आहे. मी हिंदुस्थानच्या सरकारचा सन्मान करतो. जर मी कोणात्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो. मी केलेल्या त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला आहे. मी अशा अर्थाने कधीच बोललो नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मी मनापासून सगळ्यांची माफी मागतो…, असे ललित मोदीने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या 70व्या वाढदिवसाची पार्टी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदीने लंडन येथील स्वतःच्या घरी ठेवली होती. या बर्थ डे पार्टीला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. या पार्टीचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळी ललित मोदीने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला होता.

ललित मोदी आणि विजय माल्ल्या यांच्या व्हिडीओवर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. या व्हिडीओतून विजय मल्ल्या व ललित मोदी हे हिंदुस्थानच्या सरकारची खिल्ली उडवत आहेत, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या प्रकरणाची दखल घेत हिंदुस्थान सरकार फरार झालेल्या लोकांना लवकरच परत आणेल, असे आश्वासन दिले.