
दिल्लीतील मॉडेल टाऊन परिसरातील एका रेस्टॉरंटच्या छतावरून पडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास गुर्जनवाला टाऊनमधील ‘इन्व्हिटेशन रेस्टॉरंट’मध्ये एक मुलगा उंचावरून खाली पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जखमी मुलाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कबीन कुमार (वय 16) असे त्या मुलाचे नाव असून, तो गुर्जनवाला टाऊन-२ चा रहिवासी होता. कबीन हा अशोक विहार येथील प्रूडन्स स्कूलमध्ये 11 वीत शिकत होता. घटनेच्या वेळी तो आपल्या आर्यमन, कबीर आणि यश त्यागी या तीन मित्रांसह रेस्टॉरंटमध्ये गेला होता. यावेळी दुख:द घटना घडली. कबीनच्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक तपासानुसार, कबीन आणि त्याचे मित्र रेस्टॉरंटच्या छतावर गेले होते. तिथे कबीन शेजारील दुकानांच्या मध्यभागी असलेल्या प्लास्टिकच्या शेडवर चढला होता. मात्र, त्याचे वजन पेलवू न शकल्याने तो प्लास्टिकचा शेड अचानक कोसळला आणि कबीन थेट जमिनीवर पडला. या भीषण अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी परिसरातील लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे अन्वेषण विभाग आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी कबीनच्या सोबत असलेल्या तिन्ही मित्रांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.



























































