दारू पिऊन हुल्लडबाजी कराल तर याद राखा ! थर्टी फर्स्टला ठाण्यात ५४ नाक्यांवर कडक वॉच

थर्टी फर्स्टचे काऊंटडाऊन सुरू झाले असून दारू पिऊन हुल्लडबाजी कराल तर याद राखा.. कारण ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ५४ नाक्यांवर पोलीस कडक वॉच ठेवणार आहेत. या नाकाबंदीमध्ये सापडायचे नसेल तर शिस्तीत राहा. नव्या वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करा, पण स्वतःचा व इतरांचा जीव सांभाळून, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केले आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार असून ७३९ पोलीस नाक्यानाक्यांवर वाहनचाल कांची झाडून तपासणी केली जाणार आहे.

थर्टी फर्स्ट व नववर्ष स्वागतासोबतच यंदा ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली पालिका, उल्हासनगर महापालिका आणि भिवंडी-निजामपूर महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची धूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेमध्ये ५९ अधिकारी व ६८० कर्मचारी असे एकूण ७३९ इतके मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, यंदा २०२५ या वर्षांत लोकअदालतमध्ये १ लाख ४२ हजार ६०७ई-चलन कारवाई करण्यात आली असून एकूण १४ कोटी ३४ लाख ४३ हजार २०० इतका दंड वाहनचालकांनी भरला आहे.

हे आहेत हॉटस्पॉट

येऊर, उपवन, दुर्गाडी, काटई नाका, मुंब्रा, रांजनोली नाका ही ठिकाणे हॉटस्पॉट निश्चित केली आहेत. या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर धांगडधिंगा करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. थर्टी फर्स्टसाठी बार, हॉटेल, धाबे, पब, फार्महाऊस यासह निसर्गरम्य ठिकाणे, मनोरंजन पार्क आदी ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

थर्टी फर्स्ट तसेच नवीन वर्षांचे स्वागत निर्विघ्नपणे पार पडावे याकरिता ठाणे वाहतूक विभागाचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. – पंकज शिरसाट, उपायुक्त