रेल्वेने केली चिकू उत्पादकांची नाकाबंदी

पालघर जिल्हा हा राज्यातील चिकू उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. उत्तर हिंदुस्थानात पालघरच्या चिकूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र चिकू वाहतुकीसाठीची किसान रेल सेवा कोरोना काळापासून बंद आहे. कोरोना गेला तरी अजूनही किसान रेल सेवा सुरू करण्यात रेल्वे प्रशासन गांभीर्य दाखवत नाही. त्यामुळे चिकू उत्पादकांची नाकाबंदी झाली असून त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

डहाणूसह वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी या भागातील हजारो शेतकरी चिकू बागायतदार आपला चिकू रेलद्वारे पाठवत होते. सरकारी योजनेमुळे चिकूवर रेल्वे मालवाहतूक शुल्क कमी असल्याने ते बागायतदारांना परवडत होते. किसान रेल बंद झाल्याने दिल्ली, गुजरात, उत्तर हिंदुस्थानच्या बाजारपेठांपर्यंत चिकू पोहोचण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. किसान रेल बंद झाल्याने पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. तातडीच्या सरकारी हस्तक्षेपाची गरज निर्माण झाली आहे. किसान रेल सुरू करा किंवा पर्यायी रेल्वे व्यवस्था करण्याची गरज असल्याचे पालघर जिल्हा चिकू उत्पादक संघाचे केतन पाटील यांनी सांगितले.

सरकारने शेतकऱ्यांचा कणा मोडला
देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार एकीकडे वेगवेगळे प्रयत्न करत असताना ही किसान रेल बंद करून याच शेतकऱ्यांचा आर्थिक कणा या सरकारने मोडल्याचे हतबल झालेले चिकू बागायतदार सांगत आहेत. किसान रेल बंद असल्यामुळे सद्यस्थितीत चिकू हा रस्ते मार्गाने पोहोचवला जात आहे. यामुळे बागायतदारांना तोटा होत आहे.