हास्यास्पद, धक्कादायक अन् लाजिरवाणे; शिवसेना म्हणून मिरवणारे भाजपने फेकलेल्या जागांवर लढताहेत, संजय राऊत यांचा मिंध्यांवर निशाणा

शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षाने फेकलेल्या जागांवर लढताहेत हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाणे आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. सोमवारी रात्री मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिंदे गटाचे जागावाटप जाहीर झाले. भाजप 137, तर शिंदे गट 90 जागांवर लढणार आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला राऊत उत्तर देत होते.

मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देत होती. पण काय वेळ आलीय…स्वत:ला शिवसेना म्हणजे अमित शहांची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भाजपच्या दारात जागा मागायला उभे राहावे लागते आणि त्यांनी फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची आहे. यापूर्वी 60 वर्षांच्या इतिहासात मुंबईत शिवसेना कधी कुणाच्या दारात उभी राहिली नाही. पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वत:ला शिवसेना वगैरे म्हणून घेतात ते युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शहांच्या दारात गेले आणि आता भाजपने त्यांना जागा दिल्या. हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाणे आहे.

आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सन्मानाने आघाडी केलेली आहे. 140 च्या आसपास जागा आम्ही लढतो आहोत, असे चित्र आहे. राज ठाकरे यांचा पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढतोय. राष्ट्रवादीला आम्ही जागा देत आहोत. पण एकनाथ शिंदे यांचा गट भाजपने दिलेल्या जागांवर लढतेय, याचा विचार जनता नक्की करेल. मला आश्चर्य वाटले आणि वाईटही वाटले. शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भाजपने फेकलेल्या जागांवर लढताहेत. शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती. शिवसेनेच्या मर्जीने युती होत होती. पण इथे एकनाथ शिंदे यांच्यासारखे लोक लाचार मराठी माणसाचे दर्शन घडवताहेत. हे मराठी माणसाचे दुर्दैव आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत शिंदेंना 100 च्या वर जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, मिळाव्यात, म्हणजे स्वत:च्या हिंमतीवर नाहीत, त्यांनी द्याव्यात. म्हणजे त्यांनी हात पसरून आम्हाला द्या अशी मागणी केली. 2017 मध्ये भाजपची जी भूमिका होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे लढलो. याला स्वाभिमान म्हणतात. जेव्हा जेव्हा भाजपने अडेलटट्टूपणाची भूमिका घेतली तेव्हा शिवसेना स्वाभिमानाने बाजुला होऊन स्वत:च्या बळावर लढली. पण लाचारी पत्करली नाही. जेव्हा दिलेला शब्द भाजपने पाळला नाही आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही स्वत:हून स्वाभिमानाने बाजुला झालो आणि आम्ही आमचे राजकारण केले. आम्ही ना दिल्लीत जाऊन शहांच्या दारात किंवा मोदींच्या दारात बसलो, ना गवतावर बसून सफेद पँटला गवत लावून परत मुंबईत आलो. आम्ही लढलो.. जे काही असेल त्या ताकदीने लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवला. पण आता चित्र वेगळे दिसते. त्यामुळे ताबडतोब मिध्यांनी स्वत:ला शिवसेना म्हणणे बंद केले पाहिजे. ही शिवसेना नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खरी आहे, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. अमित शहा आणि त्यांचे बिल्डर लॉबी ही मुंबई गिळायचा प्रयत्न करत आहेत. त्याविरुद्ध ही लढाई आहे. तसेच भाजपच्या यादीत अमराठी उमेदवार असल्याचे विचारले असता राऊत म्हणाले की, भाजप हा कुणाचा पक्ष आहे? भाजप मराठी माणसाचा पक्षच नाही. भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या यादीत परप्रांतियांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय? असा सवाल राऊत यांनी केला.