भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात इच्छुकांचा राडा; उमेदवारी नाकारल्याने संताप, मंत्री सावे, खासदार कराड मागच्या दाराने पळाले

युती तुटल्यानंतर स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी भाजपने मध्यवर्ती प्रचार कार्यालयातून उमेदवारांची नावे जाहीर करीत एबी फार्म वाटप केले. परंतु, त्यानंतर उमेदवारी नाकारलेल्या इच्छूक कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात गोंधळ घालला. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांनी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देत जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला, असा आरोप केला. कार्यालयात गोंधळ झाल्याने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. तणाव वाढत असल्याने मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड मागच्या दाराने वाहनात बसून पळाले.

महापालिका निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी शिंदे गट आणि भाजपने युती तुटल्याचे जाहीर केले. त्यानंतर भाजपने उमेदवार निश्चित करुन प्रत्येकांना एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली. यात अनेक जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या इच्छुकांनी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात येऊन राडा घालण्यास सुरुवात केली.

पक्ष वाढीसाठी 15 ते 20 वर्षे काम करुन स्वतःवर गुन्हे दाखल करुन घेतले. आमच्या प्रयत्नामुळे पक्ष वाढला, आणि आज पक्ष वाढल्यानंतर आम्हालाच उमेदवारी नाकारुन बाहेरून ऐनवेळी आलेल्यांना उमेदवारी दिली जात आहे. हा जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय आहे, असे म्हणत नाराज कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मध्यवर्ती प्रसार कार्यालयात आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.

आत्मदहनाचा प्रयत्न

पक्षात 20 वर्षे काम करूनही उमेदवारी नाकारल्याने संतापलेला एक कार्यकर्ता पेट्रोल घेऊन भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात दाखल झाला. त्याने पेट्रोल आणल्याचे कळताच बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्याला ताब्यात घेतले.

यांचा संताप अनावर

दिव्या मराठे, सुवर्णा माताडे, श्रीअण्णा भंडारी, लता दलाल, संध्या कापसे यांनी संताप व्यक्त केला. सुवर्णा माताडे यांना भोवळ आली.

लता दलाल शिंदे गटात

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर माजी उपमहापौर लता दलाल यांनी लागलीच शिंदे गटात प्रवेश करीत उमेदवारी दाखल केली.

पक्षासाठी नोकरी सोडली, रक्ताचे पाणी केले… आणि नवीन माणसांना उमेदवारी दिली, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केली. आम्ही एकनिष्ठ नाही का? पक्षाच्या नावावर दुकानदाऱ्या केल्या का? असा सवाल कार्यकर्त्यांनी केली. संभाजीनगरमध्ये भाजपचा पराभव करणार असा विडाही भाजप कार्यकर्त्यांनी उचलला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कमळाबाईची मिंध्यांशी फारकत, अखेर युती तुटली