
उत्तर प्रदेशातून माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. महोबा येथे राहणाऱ्या एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला आणि त्याच्या गतीमंद मुलीला एक दोन महिने नाही तर चक्क 5 वर्षे त्यांच्याच घरात डांबून ठेवण्यात आले होते. यावेळी त्या वृद्ध वडिलांचा उपासमारीने मृत्यू झाला , तर 27 वर्षीय मुलच्या शरिराचा सापळा झाला. 70 वर्षीय ओम प्रकाश सिंग राठोड यांनी त्यांची आणि त्यांच्या मुलीची काळजी घेण्यासाठी नियुक्त केलेले लोकचं त्याचे शत्रू बनले.
ओम प्रकाश यांचा भाऊ अमर सिंह राठोड यांनी या प्रकरणाबाबत इंडिया टुडे ला प्रतिक्रिया दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम 2015 मध्ये रेल्वेतून निवृत्त झाले होते. 2016 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर ते मुलगी रश्मीसोबत वेगळ्या घरात राहायला गेले. त्यांना स्वयंपाकही करता येत नव्हता. पोट भरण्यासाठी त्यांनी राम प्रकाश कुशवाहा आणि त्यांची पत्नी राम देवी यांना त्यांची आणि रश्मीची काळजी घेण्यासाठी कामावर ठेवले. त्यानंतर कुशवाहा दाम्पत्याने हळूहळू घराचा ताबा घेतला. यानंतर त्या नराधमांनी माझा भाऊ आणि भाचीला तळमजल्यावरील एका खोलीत कैद करून ठेवले. आणि हे नवरा बायको दोघे वरच्या खोल्यांमध्ये आरामात राहू लागले, अशी माहिती अमर सिंहने दिली.
ओम प्रकाश आणि रश्मीला जगण्यासाठी अन्न पाणीही दिले जात नव्हते. जेव्हा आमचे कुटुंबीय या दोघांना भेटण्यासाठी आणि विचारपुस करण्यासाठी त्यांच्या घरी जायचे तेव्हा हा नोकर त्यांना भेटण्यास नकार द्यायचा. ओम प्रकाशला आणि रश्मीला तुम्हाला भेटायचे नाहीए, असे म्हणून लोकांना माघारी पाठवायचा, असे देखील अमर सिंह म्हणाला. सोमवारी आम्हाला माझ्या भावाचे निधन झाल्याची माहिती मिळाली. जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याची अवस्था पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली.
माझा भाऊ ओम प्रकाशचा मृतदेह पूर्णपणे सुकला होता. तर रश्मी एका अंधार असलेल्या खोलीत नग्न अवस्थेत पडून होती. तिचा अक्षरश: सांगाडा झाला होता, असे अमर सिंहने सांगितले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.




























































