Ahilyanagar News – शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त 27 प्रकारच्या 200 किलो पालेभाज्या-फळांच्या सजावटीने मोहटादेवीचा गाभारा सजला

शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे मोहटा देवीच्या गाभाऱ्याची आकर्षक सजावट करण्यात आली. मंचर (ता. आंबेगाव) येथील भाविक बाळासाहेब थोरात यांनी देवीला 200 किलो वजनाच्या 27 प्रकारच्या पालेभाज्या, रानभाज्या व फळांची मनोभावे अर्पण करून गाभाऱ्याची सजावट केली. या अनोख्या सजावटीमुळे मोहटा देवीचा मुखवटा अधिक खुलून दिसत असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

थोरात हे मोहटा देवीचे निस्सीम भक्त असून त्यांनी मेथी, पालक, बटाटे, कांदा, मुळा, काकडी, गाजर, वाल, चवळी, गवार, मटार, वांगे, टोमॅटो, भेंडी, हिरवी व ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, दुधी भोपळा, शेवगा, कोथिंबीर, शेपू, लसूण, कांदापात, कारले, पुदिना, कढीपत्ता यासह विविध फळांची आकर्षक मांडणी देवीच्या गाभार्यात केली. शाकंभरी देवीच्या अन्नपूर्णा स्वरूपाचे दर्शन या सजावटीतून भाविकांना घडत आहे. दरम्यान, श्री मोहटादेवी देवस्थानच्या वतीने शांकभरी नवरात्र महोत्सवाचा पारंपारिक उत्साहात व वेदमंत्रांच्या पावन जयघोषात प्रारंभ झाला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असून परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.

देवस्थानमार्फत मोहटादेवीचे वासंतिक, शारदीय व शांकभरी अशी तीन नवरात्रे पारंपारिक पद्धतीने साजरी केली जातात. शांकभरी नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दररोज त्रिकाल आरती, सुवासिनी पूजन, श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन, अर्जन तसेच अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने या धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होत असून अनेक भक्त विविध प्रकारचे नैवेद्य देवीला अर्पण करत आहेत.