तू जगातील बेस्ट मम्मी आहेस, मला माफ कर; प्रेमभंग झालेल्या तरुणीनं मावशीला व्हिडीओ कॉल करत जीवन संपवले

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये प्रेमप्रकरणातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने हताश झालेल्या कामिनी शर्मा नावाच्या तरुणीने विष पिऊन जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, कामिनी कोतवाली परिसरातील आवास विकास कॉलनीतील रहिवासी होती. सोमवारी दुपारी तिने टोकाचे पाऊल उचलले. तिच्या कुटुंबाला याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात आणि तिच्या कुटुंबात मोठी शोककळा पसरली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी कामिनीने आपल्या मावशीच्या मोबाइलवर एक व्हिडिओ पाठवला होता. ज्यामध्ये तिने आपल्या मृत्यूला प्रियकर आकाशला जबाबदार असल्याचे सांगितले. व्हिडिओमध्ये ती रडत होती. “आकाश, तू मला इतकं मजबूर केलं आहेस की आता माझ्याकडे मरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. आय एम सॉरी मम्मी, तू जगातील सर्वोत्तम आई आहेस. तुझ्यासाठी खूप काही करायचं होतं, पण आकाशमुळे मला हे पाऊल उचलावं लागत आहे.” असे तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

कामिनीने या व्हिडिओमध्ये प्रियकराच्या कुटुंबावरही संताप व्यक्त केला आहे. तिने म्हटले की, “आकाश, मला मरायची इच्छा नव्हती. दु:ख आहे की तुझ्या घरच्यांनी तुला कधीच कोणाच्या आयुष्याशी खेळू नये हे शिकवलं नाही. मी कोणाचीही फसवणूक केली नाही कारण मी तुझ्यावर खूप प्रेम केलं होतं. तू सुद्धा सुखाने जगू शकणार नाहीस. आई तू बेस्ट आहेसच आणि मावशीही जगातील ‘बेस्ट मावशी’ असल्याचे तिने म्हटले आहे.

तरुणीच्या अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीयांना या व्हिडिओबद्दल माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. कामिनीची आई रश्मी शर्मा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी आकाशविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कामिनीचे शेजारी राहणाऱ्या आकाशवर प्रेम होते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे होते, मात्र आकाश आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नास स्पष्ट नकार दिल्याने ती प्रचंड तणावाखाली होती. याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत असून आरोपीवर कडक कारवाईची मागणी होत आहे.