
संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष बीडच्या गुन्हेगारीकडे वळाले. दिवसाढवळ्या खून, रात्रीचे दरोडे, कोणाच्याही कंबरेला रिव्हॉल्वर, सामान्य जनता जीव मुठीत घेवून जगत होती. अशा परिस्थितीत नवनीत कांवत यांच्या खांद्यावर बीडचे पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी टाकण्यात आली. एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. या वर्षभरात नवनीत कांवत हे बीडसाठी परफेक्ट मॅन ठरले. गुंडांच्या टोळ्या उद्धवस्त केल्या, कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळल्या, वर्षभरामध्ये गुन्ह्यांचा आलेख निम्म्यावर आला. गुन्हेगारीचे पाच वर्षाचे रेकॉर्ड एका वर्षात मोडले गेले. बीड जिल्हा सुतासारखा सरळ करण्याचा प्रयत्न कांवतांनी केल्यामुळे खाकीवरील विश्वास सामान्य जनतेमध्ये वाढीला लागला.
अलिकडच्या काळामध्ये बीड जिल्ह्याला बिहारची उपमा दिली जावू लागली. सहाजीकच घटनाही तशाच घडू लागल्या. बलात्कार, अपहरण, दरोडे, चोर्या हे तर नित्याचेच होते. खुनाच्या घटनाही सर्रास घडू लागल्या. गुन्हेगारीने डोके वर काढले नव्हे तर गुन्हेगारी अक्षरश: उभी राहिली. खंडणीचे प्रकार वाढले. त्यातून गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण झाल्या. वयात आलेला तरूण गुन्हेगारीकडे वळू लागला. कोणाच्याही कंबरेला रिव्हॉल्वर दिसू लागली अशी भयंकर परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती. बीड जिल्ह्यामधील जनता भयभीत होती, जीव मुठीत घेवून जगत होती. गुन्हेगारीला वाचा फोडण्याचे काम झाले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येने. त्यांच्या हत्येने जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.
बीड जिल्ह्याची गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरली. गुन्हेगारी मोडून काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले. यातूनच पोलीस अधीक्षक पदाच्या मोहिमेवर नवनीत कांवत यांना धाडण्यात आले. ज्या कामासाठी आपल्याला मोहिमेवर पाठवले तेच काम कांवत यांनी हाती घेतले. वर्षभरात पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कांवत यांची कारकिर्द पाच वर्षाचा रेकॉर्ड मोडणारी ठरली. २८ कुख्यात गुंडांना कारागृहात पाठवले. सहा टोळ्या नेस्तनाबूत केल्या. खुनाच्या घटना निम्म्यावर आल्या. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती निर्माण झाली. कांवत यांचा एकही दिवस कारवाईशिवाय गेला नाही. कांवतांनी आधी खात्याची साफसफाई केली आणि नंतर गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविले. एकाच वर्षामध्ये बीड जिल्हा सुतासारखा सरळ झाला. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांचे एक वर्ष बीड जिल्ह्यासाठी सार्थकी ठरले.





























































