
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील वेटलिजच्या बसचे ड्रायव्हिंग चालकांसाठी खडतर आणि मुंबईकरांसाठी जीवघेणे ठरू लागले आहे. कंत्राटदार कंपन्यांकडे चालकांची संख्या कमी असल्याने बेस्टच्या चालकांना वेटलिज बस चालवण्यास भाग पाडले जात आहे. त्या चालकांना पुरेसे प्रशिक्षण न देताच त्यांच्या हाती आधुनिक तंत्रज्ञानाच्या गाडय़ांचे सारथ्य सोपवले जात आहे. बेस्ट प्रशासनाची ही बेफिकिरी पादचाऱ्यांच्या जिवावर बेतू लागल्याचे उघड होत आहे.
भांडुपमध्ये काल झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेस्ट उपक्रमात कंत्राटदार कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसची लांबी 12 मीटर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या बसमध्ये क्लच नसून ब्रेक आणि एक्सिलेटर यांच्यातील अंतर फार कमी आहे. चालकाला उजव्या पायानेच ब्रेक आणि एक्सिलेटरवर नियंत्रण ठेवावे लागत आहे. त्यामुळे नव्या गाडय़ांच्या ड्रायव्हिंगबाबत चालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे असताना ते दिले जात नाही.
बसच्या मागील कॅमेऱ्यांची दुर्दशा
इलेक्ट्रिक बस जास्त लांबीच्या असल्याने चालकांना गाडी रिव्हर्स घेणे तसेच वळवणे जोखमीचे झाले आहे. बसच्या मागील भागात कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे, मात्र त्यावर वारंवार धुळीचा थर साचत असल्याने चालकांना त्यांच्यासमोरील स्क्रीनवर मागील चित्र स्पष्ट दिसत नाही. कॅमेऱ्यांची योग्य देखभाल केली जात नाही, असे एका चालकाने सांगितले.
बेस्ट प्रशासन आणि कंत्राटदारांचे साटेलोटे
सद्यस्थितीत बेस्टच्या ताफ्यात 90 टक्क्यांहून अधिक वेटलिजच्या बसेस आहेत. पुरेसे चालक नसल्यामुळे कंत्राटदार पंपन्यांच्या अनेक गाडया आगारांत उभ्या राहतात. त्याचा दंडाच्या रूपात पाच हजारांचा आर्थिक फटका बसू नये म्हणून खासगी पंपन्या बेस्टच्या चालकांची मदत घेतात. त्या चालकांना प्रशिक्षणाअभावी नव्या गाडय़ांच्या ड्रायव्हिंगचे ज्ञान नसते. याबाबतीत बेस्ट प्रशासन आणि पंत्राटदारांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोप केला जात आहे.



























































