
भांडुप पश्चिमेकडे बेस्ट बसच्या अपघाताची दुर्दैवी घटना घडल्यानंतर तेथे माणुसकीचे दर्शन घडले. कुठलाही विचार न करता नागरिक जखमींच्या मदतीला धावून गेले. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावत नागरिकांनी बसच्या खाली सापडलेल्या जखमींना बाहेर काढून त्यांना तत्काळ इस्पितळात नेण्यासाठी हातभार लावला.
अपघातानंतर काही मिनिटांतच भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब पवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी लागलीच बेस्ट बसखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास प्रयत्न सुरू केले. यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावत बसला ढकलून सर्व जखमींना बाहेर काढले. पोलिसांनी वेळीच मदतीचा हात दिल्याने जखमींना वेळेत उपचार मिळू शकल्याने त्यांचा जिवावरचा धोका टाळता आला, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मद्याचे सेवन नव्हते पण…
चालक संतोष सावंत यांना दुर्घटनेनंतर भांडुप पोलिसांनी विविध कलमांन्वये अटक करून आज न्यायालयात हजर केले. सावंत यांना 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान,अपघाताच्या वेळी संतोष सावंत हे मद्याच्या अमलाखाली नव्हते. 2008 पासून त्यांची सेवा चांगली राहिली आहे. पण त्यांनी रात्री बस चालू केली तेव्हा हॅण्डब्रेक आणि एक्सिलेटर याच्यात ताळमेळ बसला नाही, परिणामी बसने अचानक उचल घेत पुढे गेल्याने हा अपघात झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.


























































