
नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण तयारीला लागला असताना मुंबई पोलिसांनी थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला 637 नागरिकांना आज सुखद धक्का दिला. परिमंडळ- 4 मधील पोलिसांनी हरविलेले व चोरीला गेलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले. तब्बल एक कोटी आठ लाख 41 हजार रुपयांचे मोबाईल पोलिसांनी नागरिकांना परत करण्याची कामगिरी फत्ते केली.
परिमंडळ-4 अंतर्गत येणाऱ्या भोईवाडा, काळाचौकी, माटुंगा, शीव, अॅण्टॉप हिल, वडाळा किटी, आरएस किडवाई मार्ग या पोलीस ठाण्यात मोबाईल हरविल्याच्या तसेच चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा नोंदवून उपायुक्त रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शोध घेत तब्बल 637 मोबाईल शोधून काढले. ते मोबाईल आज 637 मूळ मालकांना परत करण्यात आले. आपले चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


























































