‘पिनाक’ रॉकेटची चाचणी यशस्वी; 20 किमी रेंजचा पल्ला, लक्ष्यावर अचूक हल्ला

हिंदुस्थानने ओडिशातील चांदिपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीतून पिनाक लाँग रेंज गाईडेड रॉकेटची (एलआरजीआर-120) पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली. यावेळी पिनाक रॉकेटला त्याच्या कमाल 120 किलोमीटरच्या पल्ल्यापर्यंत डागण्यात आले. उड्डाणादरम्यान रॉकेटने सर्व नियोजित इन-फ्लाइट ट्रीक यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आणि निर्धारित लक्ष्यावर अचूक मारा केला. श्रेणीत तैनात असलेल्या सर्व ट्रकिंग प्रणालींनी उड्डाणाच्या संपूर्ण मार्गादरम्यान रॉकेटवर लक्ष ठेवले. ही यशस्वी चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केली.

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेची (डीएसी) बैठक सोमवारी झाली. डीएसीच्या बैठकीत 79 हजार कोटींच्या लष्करी उपकरणांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. या बैठकीत पिनाका रॉकटेला लष्करात समाविष्ट करण्यास मंजुरी देण्यात आली.

रॉकेट सैन्यात आधीपासून वापरल्या जाणाऱया पिनाका लाँचरमधून डागण्यात आले, यामुळे हे सिद्ध झाले की, एकाच लाँचरमधून विविध रेंजचे पिनाका रॉकेट्स डागले जाऊ शकतात.

  • पिनाक हे हिंदुस्थानचे स्वदेशी मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर आहे. ते डीआरडीओने विकसित केले आहे.
  • हिंदुस्थानी सैन्य याचा वापर लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी करते. हे जीपीएस नेव्हिगेशनच्या मदतीने जलद आणि अचूक हल्ल्यांसाठी ओळखले जाते.
  • पिनाक रॉकेट लाँचर एका ट्रकवर लादलेले असते. एका ट्रकवर 12 रॉकेट टय़ूब असतात. ते कमी वेळात अनेक रॉकेट डागून दूरवरच्या शत्रूंवर मोठा हल्ला करू शकते.