
हिंदुस्थानचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ा जानेवारी महिन्यात बडोद्याकडून विजय हजारे ट्रॉफीच्या अखेरच्या तीन साखळी सामन्यांपैकी दोन सामन्यांत मैदानात उतरणार आहे. मात्र, त्यानंतर 11 जानेवारीपासून सुरू होणाऱया न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात येणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, हार्दिक 3 आणि 8 जानेवारी रोजी विदर्भ आणि चंदिगडविरुद्ध होणाऱया विजय हजारे सामन्यांत खेळणार आहे. मात्र, 6 जानेवारी रोजी जम्मू-कश्मीरविरुद्ध होणाऱया सामन्यात तो सहभागी होणार नाही. कारण टी-20 विश्वचषकापूर्वी त्याच्या शरीरावरचा ताण कमी ठेवण्यासाठी आणि वर्कलोड योग्य पद्धतीने सांभाळण्यासाठी त्याला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक मानले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिकला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळायची इच्छा होती, मात्र संघ व्यवस्थापनाने त्याला या मालिकेतून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. संघाची प्राथमिकता ही हार्दिकला आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आणि सर्वात महत्त्वाच्या टी-20 विश्वचषकासाठी पूर्णतः तंदुरुस्त ठेवण्याची आहे. हार्दिकने शेवटचा एकदिवसीय सामना मार्च महिन्यात हिंदुस्थानकडून खेळला होता. तो सामना दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीतला होता. त्यानंतर त्याने वन डे क्रिकेटपासून काहीसा ब्रेक घेतला आहे.




























































