वेळेनंतर एबी फॉर्म देण्यावरून सोलापुरात तणाव

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज आणि पक्षाचा एबी फॉर्म दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती. वेळेनंतर एबी फॉर्म दाखल करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, माकपासह अनेक पक्षांच्या नेत्यांनी प्रचंड गोंधळ घालत प्रशासनाला धारेवर धरले.

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यासाठी नॉर्थ कोर्ट प्रशालेत निवडणूक कार्यालय उभारण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी अंतिम दिवस असल्याने सर्वच पक्षीय उमेदवारांनी सकाळपासून प्रचंड गर्दी केली होती.

दुपारी तीन वाजता भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी पक्षाचे एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱयांना देण्यासाठी आले होते. यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय सादरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिंदे गटाचे अमोल शिंदे यांच्यासह इतर पक्षाच्या नेत्यांनी वेळ संपल्याचे सांगत एबी फॉर्म देण्यासाठी आक्षेप घेतला. त्यातच वेळ संपल्याने निवडणूक कार्यालयातील कक्षांचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यामुळे भाजपकडून वेळेनंतर एबी फॉर्म दाखल करण्यास प्रचंड विरोध झाला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

त्यातच माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. सत्ताधारी भाजप पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये प्रचंड वादावादी सुरू झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत नेते व कार्यकर्त्यांना बाजूला सारले. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सुमारे 800 पर्यंत उमेदवरी अर्ज दाखल करण्यात आल्याचे प्राथमिक अंदाज आहे.