
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक उमेदवारी अर्ज भरुन झाले. आता अपक्ष तसेच अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱया उमेदवारांना प्रतिक्षा आहे ती निवडणूक निशाणीची. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तब्बल 192 चिन्हे उपलब्ध करून दिली असून यामध्ये नारळ, कलिंगड, द्राक्ष, बिस्कीट, केक, पाव, कपाट, ऑटो रिक्षा, आदी चिन्हांचा पर्याय उपलब्ध आहे.
उमेदवाराच्या नावापेक्षा मतदारांना उमेदवाराचे चिन्ह सहज लक्षात राहते. चिन्हावरून उमेदवाराला मतदान करणे सोपे जाते. अपक्ष उमेदवारांना अर्ज भरताना तीन मुक्त चिन्हे नमूद करणे बंधनकारक आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यताप्राप्त नसलेल्या पण नोंदणीकृत अशा 416 पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यांना मान्यताप्राप्त पक्ष श्रेणीतील राखीव चिन्हे न देता स्वतंत्र चिन्हे दिली जाणार आहेत. त्यासाठी फळे, अन्न पदार्थ, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तब्बल 192 चिन्हे उपलब्ध आहेत.
चिन्हासाठी 3 जानेवारीपर्यंत पहावी लागणार वाट
अपक्ष व मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांसाठी 3 जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 2 जानेवारी रोजी अर्ज माघारी घ्यायचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक रिंगणात किती उमेदवार आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडून 3 जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जाणार आहे.
ही आहेत मुक्त चिन्हे
एअर कंडिशनर, कपाट, ऑटो रिक्षा, पांगुळगाडा, फुगा बॅट, टॉर्च, सायकल पंप, सफरचंद, बिस्कीट, पाव, केक, ढोबळी मिरची, फुल कोबी, नारळ, ऊस, आले, द्राक्ष, हिरवी मिरची, फणस, भेंडी, मका, भुईमूग, वाटाणे, पेर, अननस, कलिंगड, आक्रोड, जेवणाची थाळी, बस, कॅरम, मेणबत्ती, छताचा पंखा, जाते, पोळपाट लाटणे, कंगवा, संगणक, फुटबॉल, विजेचा खांब आदी चिन्हांचा समावेश आहे.
चिन्ह वाटपासाठी विशिष्ट क्रम
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चिन्ह वाटपासाठी विशिष्ट क्रम पाळला जातो. आघाडया किंवा संघटना यांना मुक्त चिन्हांपैकी अग्रक्रमाने मागणी केलेली चिन्हे देण्यासाठी सर्वप्रथ विचार केला जातो. एकापेक्षा जास्त आघाडय़ा, संघटना यांनी एखाद्या चिन्हाची अग्रक्रमाने मागणी केल्यास चिठ्ठय़ा टाकून निर्णय घेतला जातो. हे वाटप झाल्यानंतर उर्वरित चिन्हे अपक्ष उमेदवारांना मागणीच्या अग्रक्रमाचा विचार करून दिली जातात.


























































