
नागपूर महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे गटाने महायुती करून लढण्याचा निर्णय घेतला आहे, तर अजित पवार गटाने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात 94 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती लढणाऱ्या शिंदे गटाची भाजपने फक्त 9 जागांवर बोळवण केली आहे.
नागपूर महानगरपालिकेत 151 जागा असून त्यापैकी 50 ते 60 जागा मिळाव्यात असा आग्रह शिंदे गटाकडून धरण्यात आला होता. यासंदर्भात वारंवार बैठका होऊनही कोणताही तोडगा निघत नसल्याने सोमवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भाजप व शिंदे गटाच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. यामध्ये शिंदे गटाने कमीत कमी 15 जागा तरी सोडण्याची मागणी केली, मात्र भाजपकडून 5 च्या वर जागा देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. अखेर नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून भाजप 142 तर शिंदे गट 9 जागांवर लढेल, असे ठरविण्यात आले.
सुरुवातीला अजित पवार गटाशी सकारात्मक चर्चा सुरू होती. शेवटच्या टप्प्यात मात्र काही गोष्टी अनपेक्षित घडत गेल्या. शरद पवार आणि अजित पवार गटाची केवळ प्रभाग 33 मध्ये फक्त मैत्रीपूर्ण लढत आहे. बाकीच्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 75 ठिकाणी एबी फॉर्म दिले आहेत. यामध्ये अनेक नामकित व्यक्तींनी अर्ज घेतले आहेत. अजित पवार गट किती जागांवर लढत आहेत ही संख्या माझ्याकडे नाही. असे अंकुश काकडे म्हणाले.
शिंदेंकडून भाजपचेच सहा उमेदवार
शिंदे गटाला 9 जागा कागदोपत्री भाजपने देऊ केल्या आहेत, मात्र त्यातील 3 ठिकाणीच त्यांचे उमेदवार असतील तर उर्वरित 6 ठिकाणी शिंदेंकडून भाजपचेच उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. भाजपशी महायुती करून काहीच फायदा झाला नसल्याची भावना शिंदे गटात आहे.
काकडे, तांबे यांची एबी फॉर्म वाटताना तारांबळ
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या घडय़ाळ चिन्हाच्या खेळीमुळे शरद पवार गटाची तारांबळ उडाली. शरद पवार गटाचे प्रवत्ते अंकुश काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह अन्य पदाधिकाऱयांनी विविध क्षेत्रीय कार्यालयाबाहेर जाऊन इच्छुकांना एबी फॉर्म दिले.


























































