गुंडांच्या कुटुंबीयांवर अजित पवार मेहेरबान! कुख्यात गजा मारणेच्या पत्नीला, आंदेकरच्या सुनेसह भावजयीला उमेदवारी

पुणे राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणी केल्यास, त्याला बिनधास्त टायरमध्ये घाला. कोयता गँग संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घ्यावा. यासह गुन्हेगारीला थारा देणार नाही, अशी वक्तव्य करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने पुण्यातील कुख्यात गुंडांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाषणांमध्ये पतंगबाजी करणारे अजित पवार निवडणुकीत गुंडांच्या घराण्यांवर मेहेरबान का होतात? असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिला अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली, तर कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची सून सोनाली आंदेकर आणि भावजय लक्ष्मी आंदेकर यांनाही उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुण्यात दोन गुंडांच्या कुटुंबीयांनादेखील अजित पवार यांच्या पक्षाने पायघडय़ा घातल्याचे दिसून आले आहे. जर आंदेकर कुटुंबीयांना उमेदवारी दिली तर आपण आत्मदहन करू, असा इशारा आंदेकरची मुलगी कल्याणी कोमकर हिने नुकताच दिला होता. मात्र, कल्याणी कोमकरनेदेखील आंदोकरांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर यानेदेखिल अजित पवार गटातून प्रभाग 39 (ड)मधून उमेदवारी अर्ज भरला आहे.

आंदेकर कुटुंबीयालाही पायघडय़ा

कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याने नुकताच स्वतŠच्या नातवाचा खून घडवून आणल्याचा आरोप आहे. दरम्यान, त्याची सून सोनाली आंदेकर आणि भावजय लक्ष्मी आंदेकर यांना अजित पवार यांच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. नाना पेठ, भवानी पेठेसह संपूर्ण पुणे शहरात दहशतीच्या जोरावर संपत्ती लुटणाऱयांच्या कुटुंबीयाना अजित पवार गटाने उमेदवारी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पुणे पोलिसांनी कसब पणाला लावले होते. विशेषतŠ गुंड गजा मारणेला अटक करणे, आंदेकर टोळीविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला होता.