कोल्हापुरात एबी फॉर्मच्या गोंधळामुळे महायुतीच्या नेत्यांवरच अविश्वास

कोल्हापूरमध्ये  महायुतीकडून एबी फॉर्म मिळण्यास उशीर झाल्याने बहुतांश उमेदवारांना शक्तिप्रदर्शनाला फाटा देत घाईगडबडीत आणि साधेपणानेच अर्ज दाखल करायची वेळ आली. त्यात प्रतिस्पर्धी उमेदवारालाही एबी फॉर्म मिळाल्याचे समजताच. पक्षाच्या नेत्यांचाच अंदाज येत नसल्याने अनेक उमेदवारांनी महायुतीच्या नेत्यांवरच अविश्वास दाखवला.

बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस व तिसरी आघाडी वगळता बहुतांश पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर न करताच थेट एबी फॉर्म देऊन, निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. एबी फॉर्म गोळा करण्यास झालेली धावपळ आणि वेळ लागत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी बहुतांश इच्छुक उमेदवारांना शक्तिप्रदर्शन करता आले नाही. काही उमेदवार समर्थकांसह रॅलीने अर्ज दाखल करताना दिसून आले. त्यात पक्षाकडून डावलल्यामुळे ठिकठिकाणी बंडखोरी झाली. महानगरपालिकेत एकत्र लढण्याचे ठरलेले असतानाही आपल्याच विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवाराला युती केलेल्या पक्षाकडून एबी फॉर्म दिल्याने आपल्या पक्षाच्या नेत्यांनी असे का केले, असा विचार करत चेहऱयावर ताण घेऊन इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करताना दिसून येत होते.