
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात बापूसाहेब पठारे यांनी ज्या पक्षाच्या चिन्हावर आमदारकी मिळवली, त्याच पक्षाची तुतारी त्यांच्या हक्काच्या प्रभागातूनच गायब झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आमदार पठारे यांचा मुलगा, सून आणि भाचे मंडळींना थेट भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरली आहेत.
भाजपकडून खराडी–वाघोली प्रभाग क्रमांक ४ मधून सुरेंद्र पठारे यांनी तर, प्रभाग क्रमांक ३ विमाननगर लोहगाव मधून ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी अर्ज भरले आहेत. याचबरोबर पठारे यांचे भाचे संतोष भरणे यांच्या पत्नी तृप्ती संतोष भरणे यांनाही प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुलगा स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो, असे सांगत पठारे यांनी स्वतः तुतारीचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले असले, तरी खराडी व विमाननगरमध्ये भाजपचे फलक, झेंडे आणि उमेदवार हे त्यांच्या घरातूनच उभे राहिले आहेत.
आमदारांचा पक्ष कोणता आणि घराचा पक्ष कोणता?
काँग्रेसपासून राष्ट्रवादी, नंतर भाजप आणि पुन्हा राष्ट्रवादी (शरद पवार गट) असा त्यांचा प्रवास राहिला आहे. खराडी गावचे माजी सरपंच, नगरसेवक म्हणून ओळख असलेले बापूसाहेब पठारे आज स्वतःच्या प्रभागातच राजकीयदृष्ट्या कमजोर झाले आहेत का? की स्वतःच्या मतदारसंघात पक्ष वाढवायची इच्छाच उरलेली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे भाजपचे आमदार, खासदार पक्षवाढीसाठी जीव तोडून काम करत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीचे पुण्यातील एकमेव आमदार मात्र आपल्या प्रभागातच पक्षचिन्ह बाजूला सारले आहे. संपूर्ण कुटुंब भाजपात, तर स्वतः आमदार राष्ट्रवादीत असा गोंधळलेला राजकीय चित्रपट वडगावशेरीकर पाहत आहेत.
आमदारांनी इच्छुकांच्या मुलाखती अन् प्रभागात भाजपशी सेटींग!
आमदार पठारे राष्ट्रवादी काँग्रेस श्रदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. मात्र त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य मुलाखतीला नव्हते. तर, पक्षातून त्यांच्या भागातील इच्छुकांना दुसर्या पक्षात उमेदवारी देण्यात आली. एका माजी नगरसेवकासाठी तर स्वत: आमदार पठारे यांनी सेटींग लावल्याची चर्चा प्रभागात होती. त्यामुळे स्वत:च्या पक्षाचे चिन्ह बाजूला ठेवत भाजपच्या झेंड्याखाली प्रचाराला लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


























































