
बॉक्सिंग डे ऍशेस कसोटीत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी)वर मिळालेल्या इंग्लंडच्या विजयावर माजी कर्णधार मायकेल वॉनने तीव्र शब्दांत टीका केली आहे. हा विजय कसोटी क्रिकेटच्या पारंपरिक कसोटीवर उतरत नसून तो केवळ ‘लॉटरीसारखा’ असल्याचे वॉनचे ठाम मत आहे. ब्रेंडन मॅकलम आणि बेन स्टोक्स यांच्या नेतृत्वाखालील संघ खरोखरच भक्कम आहे हे सिद्ध करायचे असेल तर सिडनीत होणाऱया पाचव्या व अखेरच्या कसोटीत इंग्लंडने पूर्ण ताकदीचा आणि पाच दिवस चालणारा सामना जिंकायलाच हवा, असे वॉनने स्पष्ट केले. मेलबर्नच्या विजयावर प्रश्नचिन्ह ऑस्ट्रेलिया दौऱयातील पहिले तीन कसोटी सामने गमावून ऍशेस मालिका आधीच हातातून गेल्यानंतर इंग्लंडने चौथ्या कसोटीत विजय मिळवत पुनरागमन केले. मात्र वॉनच्या मते हा विजय गुणवत्तेपेक्षा परिस्थितीचा परिणाम होता. एमसीजीवरील वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर सामना अवघ्या दोन दिवसांत संपला.




























































