
सोलापुरात भाजपने अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरही एबी फॉर्म दिल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला असून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी शिवसेना आणि काँग्रेसने केली आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असताना भाजपने तीन वाजून पाच मिनिटांनी एबी फॉर्म दिल्याची तक्रार काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि शिवसेनेने केली आहे. भाजपच्या उमेदवारांना दुपारी तीननंतर खिडकीतून कागदपत्रे पुरवण्यात आल्याचे ऍड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे. हा सर्व प्रकार बेकायदेशीर असून निवडणूक निर्णय अधिकारी भाजपच्या बाजूने निर्णय घेत आहेत, असे सरोदे म्हणाले. हे सर्व प्रकरण बेकायदेशीर असल्याने आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी, मनपा आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली. निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल न घेतल्यास या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करू असे ऍड. सरोदे म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून याची चौकशी करावी, अशी मागणी कायदेशीर नोटीस देऊन करण्यात आली आहे. या नोटीसची प्रत मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.




























































