
गेल्या आठवडय़ात कामराज नगरातील झुडुपात गळा चिरलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या हत्येचा छडा अखेर लागला. पैशाच्या वादातून ओळखीच्याच रिक्षाचालकाने हे हत्याकांड केल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतनगर पोलिसांनी कुठलाही धागेदोरे नसताना शिताफीने तपास करत आरोपीचा शोध घेत त्याला गजाआड केले.
आमिना सिद्दिकी (41) या विवाहितेचा 25 तारखेच्या सकाळी घाटकोपरच्या कामराज नगरातील ट्रान्झिट कॅम्प परिसरात झुडुपामध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. हा प्रकार समोर येताच खळबळ उडाली होती. विवाहितेची अशी निर्घृण हत्या का व कोणी केली तेच समजून येत नव्हते. अखेर याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित गोंधळी, अस्लम खातिब, राजेंद्र चंदगुडे व पथकाने तत्काळ तपास सुरू केला. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने आरोपीचा शोध घेणे कठीण झाले होते.
कौशल्यावर काम फत्ते
तांत्रिक बाबी व मानवी कौशल्याच्या आधारे पंतनगर पोलीस आमिना राहत होती. त्या परिसरात राहणाऱया मोहम्मद इरफान ऊर्फ चांद फकरेआलम अन्सारी याच्यापर्यंत पोहचले. त्याची चौकशी सुरू केली, पोलिसांनी दट्टय़ा दाखवताच अन्सारीने गुह्याची कबुली दिली.




























































