चार दिवसांत एक लाख पर्यटकांचा पाहुणचार; नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, रायगडमधील पर्यटनस्थळे गजबजली

नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात एक लाखाहून अधिक पर्यटक दाखल झाले होते. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे चार दिवसांपासून पर्यटकांनी गजबजून गेली होती. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट, कॉटेज, लॉजमालकांनी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यटकांचा पाहुणचार केला. थर्टी फर्स्टचा जल्लोष आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज सायंकाळी ७ वाजल्यापासून पर्यटक तसेच स्थानिकांची पावले समुद्रकिनारे, गडकिल्ले, धार्मिकस्थळे तसेच पर्यटनस्थळांकडे वळू लागली. बघता बघता सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली. रात्री बारानंतर फटाक्यांची आतषबाजी करून सर्वांनी हॅपी न्यू एअर म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

पर्यटनस्थळांवर पर्यटकांची जमलेली अलोट गर्दी… फटाक्यांची आतषबाजी… हिंदी, मराठी गाण्यांच्या सुरावर थिरकत… एकमेकांना शुभेच्छा देणारे पर्यटक व स्थानिक नागरिक… अशा उत्साहपूर्ण वातावरणात रायगड जिल्हा सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यात आले. हॉटेल, कॉटेज, लॉज विद्युत रोषणाईने झळाळून गेले होते. नववर्षाचे स्वागत करताना तरुणाईमध्ये अपूर्व उत्साह होता. रात्री घड्याळात बाराचा ठोका पडताच तरुणाईने एकच जल्लोष केला. पर्यटनस्थळांसह गावागावात गाण्यांच्या तालावर ठेका धरण्यात आला होता. त्याचवेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

देवदर्शन घेऊन संकल्प

समुद्रकिनारी तसेच इतर ठिकाणी हिंदी मराठी गाण्यावर थिरकत तसेच फटाक्यांची आतषबाजी करत एकीकडे नववर्षाचे स्वागत करण्यात येत असताना काही ठिकाणी देवदर्शन घेत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यामुळे रात्री जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळांवर गर्दी झाली होती. देवदर्शन घेऊन नववर्षाचे संकल्प करण्यात येत होते.