
भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपला घेरण्यासाठी शिंदे गटाने काँग्रेससोबत छुपी युती केल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. ठराविक प्रभागांत शिंदे गट आणि काँग्रेसने समन्वयाने उमेदवारांच्या तिकिटांचे नियोजन केल्याचेही बोलले जात आहे.
भाईंदरमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती झाली नसल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. भाजपने 95 पैकी 87 जागांवर तर शिंदे गटाने 81 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शिंदे गट वेगळी चाल खेळत असून काँग्रेससोबत छुपी युती करून जागा लढवत आहे. याचदरम्यान काही ठराविक जागांवर शिंदे गटाने उमेदवार न दिल्याने याचा थेट फायदा काँग्रेसला होत आहे. शिवाय काँग्रेसनेही काही प्रभागांत शिंदेंचा उमेदवार असलेल्या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे भाजपला फटका देण्यासाठीच ही रणणीती असल्याची जोरदार चर्चा सध्या भाईंदरमध्ये सुरू आहे.

























































