
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील काही यात्रेकरूंवर संगमनेर तालुक्यातील खांबा येथे यात्रेदरम्यान हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. २९) सायंकाळी मोठ्या बाबाच्या यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर काही गावगुंडांनी लाकडी दांडे व दगडगोट्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक यात्रेकरू गंभीर जखमी झाले असून, त्यांची इर्टिगा गाडी पेटवून देण्यात आली.
खांबा येथे सायंकाळी गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला. मात्र, हा वाद वाढत जाऊन काही गावगुंडांनी म्हैसगाव येथील महिला व पुरुष यात्रेकरूंना बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी यात्रेकरूंची इर्टिगा गाडी जाळून टाकली असून, वाहन पूर्णपणे खाक झाले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पीडित यात्रेकरूंनी आमदार अमोल खताळ यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला असून, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यात आली नसल्याचा दावा केला आहे. राहुरी पोलिसांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे.
मंगळवारी (दि. ३०) म्हैसगाव येथे आठवडे बाजार असल्याने खांबा परिसरातील काही व्यापारी बाजारात आले असता पुन्हा वाद निर्माण झाला. यावेळी पीडितांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांची समजूत काढली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलीस व ग्रामस्थांमधील चर्चेनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
दरम्यान, म्हैसगाव येथील काही तरुण गुन्हा दाखल करण्यासाठी आश्वी पोलीस ठाण्यात गेले असल्याची माहिती मिळाली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

























































