
श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणासह गंभीर गुन्ह्यांतील आरोपी आणि सध्या जामिनावर असलेला बंटी ऊर्फ अस्लम शबीर जहागीरदार याच्यावर भरदुपारी गोळीबार करण्यात आला. हल्लेखोराने सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बंटी जहागीरदारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
आज दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान कब्रस्तानातील एका अंत्यविधीला उपस्थित राहून बंटी जहागीरदार हा मित्र अमीन हाजी यांच्या दुचाकीवरून घरी जात होता. सेंट लूक हॉस्पिटलच्या ओपीडी गेटजवळ पोहोचताच दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दोन पिस्तुलांमधून त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात त्याच्या छातीच्या दोन्ही बाजूंना, पायाला, पाठीला तसेच कानाजवळून गोळी लागली. एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे.
गोळीबारानंतर बंटी जहागीरदार जागीच कोसळला. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉ. रवींद्र जगधने व डॉ. संजय अनारसे यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने जहागीरदारला अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
बंटी जहागीरदारच्या मृत्यूची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच साखर कामगार दवाखान्याच्या परिसरात मोठा जमाव जमला. संतप्त भावना लक्षात घेता अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सय्यद बाबा चौक व मौलाना आझाद चौक परिसरातही जमाव जमल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.
बंटी जहागीरदार हा श्रीरामपूर नगरपालिकेतील नगरसेवक रईस जहागीरदार यांचा चुलत भाऊ होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भरदिवसा झालेल्या या थरारक गोळीबारामुळे श्रीरामपूरमधील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरात तणाव; बाजारपेठ बंद
श्रीरामपूर शहरात सध्या तणावाचे वातावरण असून, शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांची मोठी कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. देवळाली प्रवरा, राहुरी व राहता येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.
जंगली महाराज रोड, पुणे बॉम्बस्फोटातील आरोपी
असलम शबीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार (वय ५३, रा. वॉर्ड क्रमांक दोन, श्रीरामपूर शहर) हा जंगली महाराज रोड, पुणे बॉम्बस्फोटातील आरोपी असून, त्याच्याविरुद्ध एटीएस काळाचौकी, मुंबई येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला १० जानेवारी २०२३ रोजी जामीन मंजूर झाला होता.


























































