बंडोबांना थंड करण्यासाठी मिनतवाऱ्या… धावाधाव; अर्ज माघारीची मुदत आज दुपारी 3 वाजता संपणार

महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील नाराजांनी बंडाचे निशाण फडकवले. राज्यातील 29 महापालिकांत जवळपास सर्वच पक्षांत कमी अधिक प्रमाणात बंडखोरी दिसून येत आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत असल्याने या बंडोबांना थंड करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मिनतवाऱ्या आणि धावपळ सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत महायुती करून लढणाऱ्या भाजप आणि शिंदे गटात मोठय़ा प्रमाणात बंडाळी उफाळून आली असून नाराजांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पह्नापह्नी सुरू केली आहे.

महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांमुळे राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांमुळे मोठय़ा प्रमाणात मतविभाजनाचा धोका आहे. त्यामुळे बंडखोरांच्या माघारीसाठी महायुती व आघाडीच्या नेत्यांनी  प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात काही ठिकाणी यशदेखील आले आहे, मात्र जोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतला जात नाही  तोपर्यंत धाकधूक कायम आहे. पक्षाच्या नेत्यांनी विनंती करूनदेखील न ऐकणाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचा इशाराही दिला जात आहे.

शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, सामंतांचे प्रयत्न

शिंदे गटातील बंडखोरांना संपर्क साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. त्याशिवाय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत.

आजचा दिवस निर्णायक

कोणता पक्ष किती बंडोबांना रोखतो, कोणत्या वॉर्डात बंडखोरी कायम राहते याचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा दिवस सर्वच राजकीय पक्षांसाठी निर्णायक आणि महत्त्वाचा असणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडोबांना रोखण्याचे आव्हान

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे गट स्वबळावर निवडणुकीला सामोरा जात आहे. तरीदेखील दोन्ही पक्षांत मोठय़ा प्रमाणत बंडखोरी उफाळून आली आहे. भाजपकडून 19 तर शिंदे गटाकडून 18 बंडखोर रिंगणात असल्याने दोन्ही पक्षांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

अमरावतीत बावनकुळे रवी राणा यांच्याशी चर्चा करणार

भाजपकडून ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. शुक्रवारी भाजपचे सर्व अपक्ष माघार घेतील. अमरावतीत उद्या सकाळी दहा वाजता जाऊन आमदार रवी राणा यांच्याशी चर्चा करून त्यांना माघारीसाठी विनंती केली जाईल, असे भाजपचे निवडणूक प्रभारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तसेच नागपुरात अपक्ष लढणाऱ्या डेहकर यांची नाराजी दूर होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर

भाजपमध्ये नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्वच ठिकाणी बंडाचा उद्रेक झाला आहे. बंडखोरांची समजूत काढून, त्यांची मनधरणी करून, भविष्यात राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन देऊन उमेदवारी मागे घेण्यासाठी मिनतवाऱ्या सुरू आहेत. वेळप्रसंगी साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर होत असल्याची चर्चा आहे.

नॉट रिचेबलमुळे टेन्शन

महापालिका निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल करणारे काही उमेदवार शोधूनही सापडेनासे झाले आहेत. काही उमेदवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. अर्ज दाखल केल्यावर काही उमेदवार अज्ञातस्थळी निघून गेले असून त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल लागत असल्याने अनेकांचे टेन्शन वाढले आहे.

फडणवीसांची फोनाफोनी

बंडखोरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून शक्तिशाली बंडखोरांशी स्वतः ते पह्नवरून संपर्क साधत आहेत. याशिवाय जिह्यातील प्रमुख नेत्यांकडेही बंडखोरांची समजूत काढण्याची जबाबदारी दिली आहे.

आश्वासनांचा पाऊस

नाराजांना थोपवण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. यावेळी नाही, पुढच्या वेळी संधी देऊ, स्वीकृत नगरसेवक, पालिकेच्या समितीत स्थान देण्याचे आश्वासन देऊन बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कुछ तो गडबड हैभाजप आणि शिंदे गटाचे 13 नगरसेवक बिनविरोध

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीवेळी घडले ते आताही घडताना दिसत आहे. विविध महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे 13 नगरसेवक बिनविरोध ठरले आहेत. कुठे समोरच्या उमेदवारांचे अर्ज बाद झालेत, कुठे उमेदवाराने माघार घेतलीय तर कुठे समोर उमेदवारच नाही, असे चित्र पाहायला मिळाले. त्यावरून कुछ तो गडबड है… अशी शंका विरोधक घेत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे 5 तर शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी होणार हे निश्चित झाले. येथे विरोधात अर्ज भरणाऱ्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. भिवंडीत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील हे बिनविरोध ठरणार हे निश्चित झाले. भाजपच्या धुळ्यात दोन, पनवेलमध्ये 1, शिंदे गटाची जळगावात 1 जागा बिनविरोध ठरली आहे.