ठाकरे बंधूंचा झंझावात, सहा संयुक्त धडाकेबाज सभा; रविवारी शिवसेना-मनसे वचननामा

शिवसेना-मनसे युतीने महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची जय्यत तयारी केली असून प्रचारात ठाकरे बंधूंच्या धडाकेबाज सभांचा झंझावात पाहायला मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहा संयुक्त सभा घेणार आहेत. ठाकरे बंधूंच्या या जाहीर सभा संपूर्ण चित्र पालटणाऱ्या ठरणार असल्याने युतीचे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. तत्पूर्वी, रविवार, 4 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना व मनसे युतीच्या संयुक्त वचननाम्याचे प्रकाशन होणार आहे.

महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 3 जानेवारी आहे. त्यामुळे विविध पक्षांचे अधिकृत उमेदवार कोण हे चित्र शुक्रवारी सायंकाळीच स्पष्ट होणार आहे. त्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. मात्र सर्वाधिक उत्सुकता उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या सभांची आहे. त्यासाठी युतीच्या शिलेदारांनी जोरदार तयारी केली आहे.

मुंबईसह महानगर प्रदेशात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या संयुक्त जाहीर सभा होतील, अशी माहिती शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज दिली. मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी पूर्व व पश्चिम उपनगरात आणि शिवतीर्थावर संयुक्त सभा होईल. त्यानंतर मीरा-भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिकमध्ये दोन्ही नेते संयुक्त सभा घेतील. उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरलादेखील सभा घेतील,  असे संजय राऊत म्हणाले.

आदित्य ठाकरे व अमित ठाकरे वचननाम्यावर काम करत आहेत!

‘शिवसेना नेते आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे हे युतीच्या वचननाम्यावर काम करत आहेत. मुंबईच्या विकासासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी ज्या काही योजना अमलात आणायच्या आहेत त्यावर काम सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून वचननाम्यावर शेवटचा हात फिरवला जात आहे,’ असे संजय राऊत यांनी सांगितले.

पहिला दिवस देवाचा!

प्रथमारंभी प्रणाम करतो… म्हणत नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी तुफान गर्दी केली.