‘पैसा झाला मोठा’च्या घोषणा देत आंदोलन, भाजप निष्ठावंतांचा उद्रेक

महापालिका निवडणुकीसाठी एकाच गटात दोन-दोन एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज बाद केल्यावरून आज दुसऱ्या दिवशीही भाजप निष्ठावंतांचा आक्रोश सुरूच होता. नाशिक रोड येथे शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालून गाजर भेट देण्यात आले. आमदारांचा धिक्कार करीत ‘पैसा झाला मोठा’च्या घोषणा देण्यात आल्या.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 30 डिसेंबर रोजी एकाच गटात दोन-दोन इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे अनेक निष्ठावंतांची उमेदवारीच बाद झाली. दोन-दोन एबी फॉर्म देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत हे निष्ठावंत आक्रोश करीत आहेत. गुरुवारी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना नाशिक रोड येथील मंडल संपर्क कार्यालयात संतप्त निष्ठावंतांनी घेराव घातला. ‘आजी-माजी आमदारांचा धिक्कार असो’, ‘पळपुटय़ा शहराध्यक्षांचा धिक्कार असो‘, ‘निष्ठा छोटी, पैसा मोठा’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी भाजपातील  खदखद समोर आली.

पक्षाच्या कोअर कमिटीने जाहीर केलेल्या उमेदवारांनाच एबी फॉर्म दिले जात होते. मात्र, 108 फॉर्म दिल्यानंतर गोंधळ उडाला, तेव्हा सह्या केलेले काही फॉर्म कुणी घेतले असतील, हे नाकारता येत नाही, असे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना याआधीही पक्षाने घरचा रस्ता दाखवला आहे. सुधाकर बडगुजर यांच्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल प्रदेश पदाधिकाऱ्यांना पाठवला जाईल. तसेच उमेदवारी नाकारली गेल्याने रोष व्यक्त करणाऱ्यांविषयीचाही अहवाल दिला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. गोंधळ घालून एबी फॉर्म जोडणाऱ्यांना माघार घ्यायला लावली जाईल, त्या ठिकाणच्या अर्ज बाद झालेल्यांना पक्षाकडून पुरस्कृत केले जाईल, अशीही चर्चा सुरू आहे.