महाराष्ट्राच्या पोरींकडून नववर्षाची जेतेपदाची भेट, बीसीसीआयची 19 वर्षांखालील वन डे ट्रॉफी जिंकली

महाराष्ट्राने सांघिक कामगिरीच्या जोरावर बीसीसीआयच्या 19 वर्षांखालील वन डे क्रिकेट स्पर्धेच्या किताबावर आपले नाव कोरून तमाम मराठी क्रिकेटप्रेमींना नववर्षाची गोड भेट दिली. महाराष्ट्राने अंतिम लढतीत गुजरातला 7 फलंदाज राखून धूळ चारली. ग्रिशा कटारिया व प्रेरणा सावंत यांची अचूक गोलंदाजी व आघाडीच्या फळीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने सहज विजेतेपदाला गवसणी घातली.

गुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर महाराष्ट्राच्या पोरींनी हा जेतेपदाचा पराक्रम केला. गुजरातकडून मिळालेले 224 धावांचे लक्ष्य महाराष्ट्राच्या पोरींनी 39.4 षटकांत केवळ 3 बाद 226 धावा करीत सहज पूर्ण केले. या विजयात जिया सिंग (57) व अक्षया जाधव (नाबाद 54) यांनी अर्धशतके झळकावली. साह्याद्री कदम (48) व भाविका अहिरे (नाबाद 46) यांनी आक्रमक फलंदाजी करत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गुजरातकडून अचशा परमारने 2, तर दिव्या जरीवाल हिने एक फलंदाज बाद केली.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 46.5 षटकांत 223 धावसंख्या उभारली. यात मधल्या फळीतील दिव्या वर्धनी हिने 81 धावांची खेळी केली, तर आघाडीची फलंदाज चार्ली सोलंकी (56) हिनेही अर्धशतक झळकाविले. मात्र महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी निर्णायक टप्प्यावर अचूक गोलंदाजी करीत गुजरातच्या धावगतीला चाप लावला. ग्रिशा कटारियाने 4, तर प्रेरणा सावंत हिने 3 बळी टिपले. इशा घुलेनेही एक फलंदाज बाद केली.