
सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा नियमित आरोग्य तक्रारींवर हमखास घेतल्या जाणाऱया किंवा डॉक्टरांकडून लिहून दिल्या जाणाऱया निमेस्युलाईड पेनकिलरवर सरकारने बंदी घातली आहे. निमेस्युलाईड या औषधाचे 100 मिलीग्रॅमपेक्षा जास्त सेवन आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे या मर्यादेतच या औषधाचे सेवन करता येईल, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार नमेस्युलाईडचं 100 मिलीग्रॅमपेक्षा जास्त प्रमाण असणारी औषध निर्माण करणे, विक्री करणे किंवा वितरित करणे यावर बंदी घालण्यात येत आहे. या औषधामुळे यकृतामध्ये इन्फेक्शन होत असल्याची काही प्रकरणे समोर आली होती. यासंदर्भात आयसीएमआरने केलेल्या शिफारशी केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेकडून मान्य करण्यात आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे.
कोणाला देऊ नये
- आयसीएमआरने निमेस्युलाईडचा वापर कोणत्या परिस्थितीमध्ये करण्यास परवानगी असेल, याबाबतही नियमावली दिली आहे. जेव्हा इतर सर्व प्रकारची औषधं निष्प्रभ ठरली असतील तेव्हाच शेवटचा पर्याय म्हणून निमेस्युलाईडचा वापर केला जावा, असे आयसीएमआरने म्हटले आहे. शिवाय अशा प्रकरणात गर्भवती, बाळंतीण माता किंवा गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या मातांना हे औषध दिले जाऊ नये, असेही आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.
- यकृताचा आजार असणाऱया रुग्णांना हे औषध दिले जाऊ नये. तसेच पर्याय नसताना हे औषध देण्याची वेळ आली तरी 12 वर्षांखालील मुलांना हे औषध दिले जाऊ नये, असेही आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.






























































