
कॅनडातील व्हँक्यूरहून दिल्लीला येणाऱया एअर इंडिया विमानाच्या टेक ऑफआधी वैमानिकाने मद्यपान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार वेळीच लक्षात आला आणि वैमानिक बदलण्यात आला. त्यामुळे विमानाच्या उड्डाणास विलंब झाला.
एअर इंडियाचे एआय 186 विमान 23 डिसेंबर रोजी व्हँक्यूअरहून दिल्लीला येणार होते. त्यावेळी टेक ऑफच्या आधी एअर इंडियाच्या वैमानिकाने मद्यपान केले. त्यामुळे त्याला विमानाबाहेर काढण्यात आले. याच कारणामुळे विमानाचे टेक ऑफ होण्यासाठी वेळ गेला. कॅनडातील अधिकाऱयांनी वैमानिकाच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त केली. त्याला चौकशीसाठी ते घेऊन आले. वैमानिकाच्या तोंडातून मद्याचा वास येत होता. प्रोटोकॉलप्रमाणे त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा त्याने मद्यपान केल्याचे समोर आले. त्यानंतर एअर इंडियाने दुसऱया वैमानिकाला विमान दिल्लीत आणायला सांगितले. सध्या मद्यपान करणाऱ्या वैमानिकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. एअर इंडियाने स्पष्ट केलेय की, वैमानिकाचे वर्तन चुकीचे आहे. त्याने नियमबाह्य वर्तन केले असल्याचे आढळून आले तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.





























































