
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीत ठिकठिकाणी बंडखोरी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी एकाच पक्षाचे किंवा युतीतील वेगवेगळे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने बंडोबांना थंड करण्याचे आव्हान महायुतीच्या नेत्यांपुढे आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत जवळपास 50 ठिकाणी भाजप-शिंदे गटात बंडखोरी झाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीतील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे टाळले. उमेदवार कोण किंवा महायुतीत कुठली जागा कुणाला सोडण्यात आली याबाबत कमालीची गुप्तता पाळत उमेदवारांना थेट शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्यास सांगितले. तरीदेखील मुंबईत महायुतीत मोठय़ा प्रमाणात बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. ही बंडखोरी थोपविण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.
यांचे अपक्ष अर्ज दाखल; महायुतीला टेन्शन
भाजप – वार्ड 51 – सुशीला जाधव, वार्ड 54 – संदिप जाधव, वसंत राऊत, वार्ड 60 – दिव्या ढोले, वार्ड 64 – माया राजपूत, वार्ड 86 – सरबजीत संधू, वार्ड 94 – विवेका दाभोळकर, वार्ड 173 – शिल्पा केळुसकर, वार्ड 200 – गजेंद्र धुमाळे, वार्ड 225 – कमलाकर दळवी
शिंदे गट – वार्ड 7 – भूपेंद्र कवळी, वार्ड 8 – नम्रता कवळी, वार्ड 11 – अमित जैसवाल, वार्ड 22 – निखिल बुडजुडे, वार्ड 26 – सचिन केळकर, वार्ड 51 – श्रेया शिंदे, वार्ड 67 – राजू नेटके, वार्ड 71 – अजिता जनावळे, वार्ड 77 – वैभवी परब
शिंदे गटात सर्वाधिक 35 जणांचे बंड
शिंदे गटात 35 इच्छुकांनी उमेदवारी मिळाली नाही. यामुळे बंडाचे निशाण फडकवले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे तसेच मिलिंद देवरा यांच्याकडून स्वतः अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बंडखोरांशी थेट संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आली. पक्षाची अधिकृत भूमिका समजावून सांगत, नाराज पदाधिकाऱयांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर पक्षातील काही नेत्यांच्या समर्थकांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनीदेखील पक्षाशी तूर्तास संपर्क तोडत नाराजी व्यक्त केल्याने शिंदे गटाची धावपळ उडाली आहे.
साटम, शेलारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू
पक्षाचे स्थानिक नेते, आमदार, खासदार यांच्याकडून बंडखोरांना समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत 50 हून अधिक ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाल्याने मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, निवडणूक प्रभारी आशिष शेलारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात काही ठिकाणी त्यांना यश आल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.




























































